आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष:मराठवाडा मुक्तिलढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी बाळासाहेब ठाकरे होते आग्रही

दिवाकर रावते | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
१७ सप्टेंबर १९९८ रोजी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, दिवाकर रावते. आदी. छायाचित्र : महेश होकर्णे, नांदेड.
  • नांदेड येथील पहिल्या ध्वजारोहण साेहळ्यास माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, मनोहर जोशी यांची होती प्रमुख उपस्थिती
  • ...अन् मराठवाड्यासाेबत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराही झाले स्वतंत्र

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शासकीय ध्वजारोहणाची परंपरा सन १९९७-९८ पासून सुुरू झाली. यासाठी युती सरकारच्या काळात प्रयत्न करणारे तत्कालीन मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितलेल्या आठवणी त्यांच्या शब्दांत.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा मात्र निझामाच्या जोखडात प्रचंड हालअपेष्टा सहन करत होता. स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिल्याने १७ सप्टेंबरला १९४८ रोजी येथील जनतेने मुक्ततेचा श्वास घेतला. देशाचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी पोलिस अॅक्शन घेतली म्हणून स्वातंत्र्य अनुभवता आले, अन्यथा आज देशाच्या कुशीत दुसरा पाकिस्तान वावरला असता. वर्ष-सव्वा वर्ष चाललेल्या या कडवट लढ्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून १९९७-९८ च्या काळात प्रस्ताव तयार करून सतत पाठपुरावा केला. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्वत: याबाबत आग्रही होते. निझाम राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदान व या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच युती सरकारच्या काळात १७ सप्टेंबर १९९८ रोजी प्रथमच शासकीय स्तरावर मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम साजरा करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

तत्कालीन युती सरकारच्या काळात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष झालो. मराठवाड्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी असंख्य लोकांना भेटलो, प्रत्येक जिल्हा पिंजून काढला. मुक्तिसंग्रामाचा लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनाही अनेकदा भेटणे व्हायचे. लातूर येथील स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर वाजपेयी यांनी मला या लढ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात प्रामुख्याने वाजपेयी यांनी जसा देशाचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तसा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन १७ सप्टेंबरला साजरा व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी बोललेले ते वाक्य सतत राहून राहून आठवत होते. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली.निजामाच्या राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही खूप चांगल्या प्रकारे माहिती होते. त्यामुळे हा दिवस अगदी जल्लोषात साजरा व्हायला हवा, या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, अशी त्यांचीही आग्रही भूमिका होती. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी बोललो. त्याचा प्रस्तावही सादर केला. लातूर येथे १९९७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा मेळावा घेतला. याच कार्यक्रमात त्यांनी पुढील वर्षीपासून शासकीय स्तरावर मुक्तिसंग्राम दिन साजरा करणार असल्याची घोषणा केली.पहिला शासकीय कार्यक्रम नांदेडमध्ये : शासकीय स्तरावर मुक्तिसंग्राम दिन साजरा होण्याआधी त्या त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी स्वातंत्र्यसैनिकांना बोलावून चहापान करून पाठवायचे. पण याची घोषणा झाल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा पहिला कार्यक्रम नांदेडमधील श्री गुरू गोविंदसिंग स्टेडियममध्ये झाला. यात स्वातंत्र्यसंग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेणारे व राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याचेही भाग्य लाभले. यानंतर मी मांडलेल्या संकल्पनेतून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा स्तंभ उभारले गेले. यासाठी वैधानिक विकास मंडळामार्फत निधी उपलब्ध करून दिला होता.

...अन् मराठवाड्यासाेबत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराही झाले स्वतंत्र

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका (आता कोरपना व जिवती धरून तीन तालुके) निझाम स्टेटचा भाग होता. त्यामुळे हा भाग १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला नाही. “पोलिस अॅक्शन’नंतर १७ सप्टेंबरला निझाम स्टेट भारतात विलीन झाले आणि राजुरा तालुकाही स्वतंत्र झाला. तालुक्यात हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या लढ्यात तालुक्यातील अनेकांनी तुरुंगवास भोगला.