आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ यांनी सांगितला जुना किस्सा:केशवराव धोंडगे यांच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची अटक टळली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाई केशवराव धोंडगे म्हणजे अजब रसायनाने भरलेले व्यक्तिमत्त्व आहे असा त्यांचा उल्लेख राजकीय पत्रपंडित करतात ते अगदी सार्थ असे आहे. ते जनसामान्य जनतेच्या हितासाठी व सत्य व न्यायासाठी लढणारे व्यक्तीमत्व असल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्ती निमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत आपले मनोगत व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरेंची अटक टळली

सभागृहात केशवराव धोंडगे यांच्याबाबत बोलत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले "मी एक गोष्ट सांगतोय, जी कदाचित अनेकांना माहिती नाही. त्यावेळी शीख धर्मियांच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी एक टिप्पणी केली होती. त्यामुळे शीख धर्मियांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यावेळी शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. ते अतिशय कडक आणि नियमाने चालणारे होते. घाबरणारे नव्हते. त्यांनी निर्णय घेतला की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायची.

"ही गोष्ट कानोकानी आमच्या शिवसेनेच्या गोटामध्ये पोहोचली. त्यावेळी मनोहर जोशी, नवलकर मला म्हणाले की, 'बाळासाहेबांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक होणार. काहीतरी करायला पाहिजे.' हे शंकरराव चव्हाण यांना कसं सांगायचं आणि मग माझ्या डोक्यात कल्पना आली. त्यानंतर मी केशवराव धोंडगेंना भेटलो. त्यांना सांगितलं. त्याचबरोबर यापूर्वी बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर मुंबई कशी तीन दिवस जळत होती. तेही सांगितलं. त्यावर ते म्हणाले काळजी करू नको.

पुढे छगन भुजबळ म्हणतात की, सभागृह सुरू झाले. केशवराव धोंडगे उभे राहिले आणि म्हणाले मला बोलायचं आहे. केशवराव धोंडगे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आम्हाला असे कळलंय की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कल्पना आहे की, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा तीन दिवस मुंबई जळत होती. तुम्ही असा परत निर्णय घेणार आणि मुंबई-महाराष्ट्राला वेठीस धरू पाहत आहात का? तुम्ही याचा फेरविचार केला पाहिजे. टिप्पणी केली असेल, मीटिंग घ्या, दोन्हीकडील लोकांना बोलवा, पण असा निर्णय घेऊ नका आणि मुंबई, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका."

"केशवरावांच्या भाषणानंतर प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या शंकरराव चव्हाणांसारख्या नेत्याने आपला निर्णय मागे घेतला आणि त्यावेळी घडणारा प्रसंग टळला. तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेलाय. आज यानिमित्ताने आठवला", असा किस्सा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात सांगितला.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना छगन भुजबळ म्हणाले की, शेकापचे ज्येष्ठ नेते ज्यांची वादळी कारकीर्द असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केशवरावजी धोंडगे यांनी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. कायम आपला पक्ष शेकाप सोबत निष्ठेने राहणारे नेते डॉ. केशवराव धोंगडे हे परखड भूमिका व आक्रमक भाषेला अभ्यासू व आक्रमक आंदोलनाची जोड देऊन सरकारला सळो की, पळो करून सोडत असत. मन्याड खोऱ्याचा वाघ अशी त्यांची ओळख आहे. डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

थेट पवार साहेबांचा मुकाच घेतला

ते म्हणाले की, केशवराव म्हटले की एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. कपाळावर मातीचा टिळा लावलेले, पांढऱ्याशुभ्र नेहरू शर्टातील आणि धोतरात वावरणारे अगदी शांत आणि चालते बोलते व्यक्तिमत्व. हा पण एक गोष्ट त्यांची मोठीच डेंजर होती म्हणजे, कधी काय बोलतील सांगता यायचं नाही. कधी बोलता बोलता नाचतील तर कधी थेट काळजाला लागेल असं तिखट बोलतील. पण जी काही वागणूक असायची ती खरी आणि तितकीच स्पष्ट.स्पष्टवक्तेपणा त्यांच्या अंगी नेहमी असायचा. छत्रपती शिवाजी महाराज, जीवा महाला यांचे चरित्र, कंधार तालुक्यातील चळवळ, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्र . के अत्रे. यांच्यावर त्यांचे मोठे प्रेम भरभरून या गोष्टींवर ते बोलत असत केशवराव धोंडगे कधी काय करतील याचा नेम नाही. एकदा नांदेडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी थेट पवार साहेबांचा मुकाच घेतला. त्यानंतर पवार साहेबांवर भाषण करताना मात्र पवार साहेबांवर टीका केली त्यामुळे कधी प्रेम तर कधी शब्दांचे बाण मारणारे केशवराव आहेत, असे त्यांनी यावेळी सांगतिले.

'गल्ली ते दिल्लीवर स्वार'

धिप्पाड शरीरयष्टी, बोलण्यात रांगडेपण, जनसामान्यांत थेट मिसळण्याची व्रुत्ती, सत्य व न्यायासाठी काहीही करायची तयारी, पांढराशुभ्र पोषाख, विशिष्ट पध्दतीने घातलेले धोतर, त्याचा एक लांब सोगा हातात धरलेला, त्याचा वापर प्रसंगी तोंड झाकायला व पुसायलाही व्हावा, ते काम सरल्यावर कंबरेत खोचून रिकामा हात शड्डू ठोकण्यास तयार. अशी स्वारी मग गल्ली ते दिल्लीवर स्वार झालेली. अनेकांच्या ह्रदयावर केशवरावांची ही प्रतिमा रुतून बसली आहे. तब्बल सहा विधानसभा निवडणुका त्यांनी लीलया जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगतिले.

'रंग बदलणारे खूप'

ते म्हणाले की, आमच्यासारख्यांचा पक्ष दुबळा होतो, पण आम्ही लढत राहू. सध्या एकाधिकारशाही राजकारणाचा जोर आहे. त्याला विरोध करावा लागेल. मी शंभरीत असलो तरी शेवटपर्यंत ते करीन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत. पण रंग बदलणारे खूप. सरडय़ासारखे रंग बदलतात. तत्त्वाचे राजकारण करायचे असेल तर ‘म्होतूर’ संस्कृती थांबायला हवी’ असे मत भाई केशवराव धोंडगे व्यक्त करतात. 1957ते 1995 अशा दहा निवडणुका आणि 11 मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी 40 पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी केलेली भाषणे, शब्दकोटय़ा, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरताना भल्याभल्यांची भंबेरी उडवली. तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनादेखील त्यांनी ठणकावले असल्याच्या आठवणी यावेळी त्यानी सभागृहा समोर मांडल्या.

'एक पक्ष आणि एकच झेंडा'

ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांनी वयाची शंभरी पूर्ण केली असे वाटतच नाही. तोच करारीबाणा त्यांच्या अंगी आजही आहे. त्यांचा उत्साह, राजकीय निर्धार अद्यापही दांडगा आहे. ते म्हणतात, ‘सध्याचे राजकारणी ‘म्होतूर’ लावत फिरत असतात. ते कोणत्या पक्षात असतात, हे त्यांनाही माहीत नसते. त्यामुळे एक पक्ष आणि एकच झेंडा घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्याचे फार बळ नसले तरी आम्ही लढत राहू, जय क्रांती म्हणत राहू असे धोंडगे सांगतात. दहा निवडणुका म्हणजे जवळपास पन्नास वर्षाच्या राजकीय काळात लोकांनी धोंडगेंचा गाडा… बंबईला’ धाडा’… हे तंतोतंत खरे करून दाखविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

'महाराष्ट्र हादरून सोडला'

ते म्हणाले की, राज्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद ज्या भागात होती त्यात कंधारचे नाव अग्रस्थानी होते. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेकाप’चे भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या अभ्यासू व विनोदी,मार्मिकतेने महाराष्ट्र हादरून सोडला होता. भाई केशवराव धोंडगे म्हणजे अजब रसायनाने भरलेले व्यक्तिमत्त्व आहे, असा त्यांचा उल्लेख राजकीय पत्रपंडित करतात ते अगदी सार्थ असे आहे. कुणी कुठेही जावो. कुणी काही म्हणो माझ्या मनात व घरावर लाल झेंडा कायम फडकत राहील..तुम्ही आजकालचे लोक क्षणाक्षणाला पक्ष, निष्ठा बदलता...', अशा अस्वस्थ भावना शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी खासदार, आमदार व ज्येष्ठ नेते भाई डॉ. केशवराव धोंडगे हे आज व्यक्त करतात. त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अश्या मोठ्या चळवळीत आणि आंदोलनात त्यांचा सहभाग होता जनतेवर त्यांचे प्रेम होते आणि आजही आहे त्यामुळे जनता देखील त्यांच्यावर प्रेम करते आणि करत राहील, असा मला विश्वास असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...