आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान काय असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली. भाजप लोकोपयोगी कामे करण्यापेक्षा सुडाचे राजकारण करण्यातच अधिक रस घेत आहे. भाजपने वेगवेगळे दिन पाळण्यापेक्षा महागाई दिन पाळला पाहिजे. धर्मांमध्ये भेद निर्माण करण्यात संघ यशस्वी झाला आहे. पण, सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणे हा काँग्रेसचा विचार आहे. यात आम्हाला आणखी जास्त काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे येत्या 9 ते 15 ऑगस्टदरम्यान क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ ‘आजादी गौरव पदयात्रे’चे आयोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात निघणाऱ्या या पदयात्रेच्या पूर्वतयारीची माहिती त्यांनी दिली.
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला ओळख मिळालेली नाही तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांनीही देशाचा गौरव केला. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला प्रगतीपथावर नेले, परंतु सद्याच्या भाजप सरकारने जनतेचे जगणे अवघड केले आहे. दूध,दही यांच्यावरही कर लावला जात असून सध्या देशात लोकशाही राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.
काँग्रेस ही एक विचारधारा
काँग्रेसला कठीण दिवस आले का, या प्रश्नावर उत्तर देताना थोरात म्हणाले की, काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचारधारा आहे.राज्यघटनेची मुलभूत तत्वे ही काँग्रेसचे विचार आहेत. या विचारधारेची जपणूक करणे ही एक जबाबदारी आहे. आज काँग्रेसला नाही तर विचारधारेलाच कठीण दिवस आले आहेत.
पुढे ते म्हणाले की, युपीएच्या काळात अनेक महत्त्वाची कामे झाली. रोजगार हमीच्या माध्यमातून नागरिकांच्या हाती रोजगार दिला. माहिती अधिकार, शिक्षण अधिकार, अन्न सुरक्षा कायदे हे युपीएच्या कालखंडात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खातेवाटपाचा घोळ
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर थोरात म्हणाले की, महिन्यानंतरही मंत्रीमंडळ तयार होत नसल्याने दोन जणांच्या या सरकारला मंत्रालयातून नव्हे तर सचिवालातून कारभार करण्यात स्वारस्य आहे. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यांना आपसातील वाद मिटवण्यासाठी दिल्लीमध्ये थांबावे लागत आहे. हा सर्व खातेवाटपाचा घोळ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.