आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या ट्विटवर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत काल जाहीर खुलासा केला. तर 'तो मी नव्हेच' असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सांगत असून संजय राऊत यांनी यावर टीका केल्यानंतर सीमावादात आता फेक ट्विटर अकाऊंट आणि लखोबा लोखंडेची एंट्री झाली. पण ते वादग्रस्त ट्विट सीएम बोम्मईंच्या अकाऊंटवर आजही असून त्यावर सहा दिवस उलटून कारवाई झाली नाही त्यामुळे ट्विटर अकाऊंट फेक की, खरे हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत यांची एकत्रित बैठक बोलावली होती. रात्री आठच्या सुमारास संसदभवनातील शहांच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीनंतर अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमित शहा म्हणाले - फेक ट्विटरमुळे वाद
अमित शहा म्हणाले, दोन्ही राज्याच्या बड्या नेत्यांच्या नावाने फेक ट्विटरने मोठी भूमिका बजावली. दोन्ही राज्यातील नेत्यांचे फेक ट्विटर अकाऊंट तयार केले. त्यामुळे हे प्रकरण एवढे गंभीर आहे की, त्यावरून दोन्ही राज्यांतील जनतेच्या भावना दुखावल्या यातून नवे वाद, घटना जन्म घेत आहेत त्यामुळे फेक ट्विटरवर कारवाई केली जाणार आहे.
बोम्मईंचे फेक ट्विटर अकाऊंट?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अमित शहांसोबत सीमावादावरील बैठकीत सहभागी होते. तिथे अमित शहांसमोर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी कोणतेही वादग्रस्त ट्विट केले नाही. माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट असून त्यावर कारवाई केली जाईल. बैठकीतील ही बाब काल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. मात्र, 9 डिसेंबरला बोम्मई यांनी जे ट्विट केले होते ते ट्विट अजूनही बोम्मईंच्या त्यांच्या नावे असलेल्या ट्विटर अकाऊंटवर अजूनही कायम आहे.
कन्नड ट्विटचा मराठी अनुवाद
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटरवर एक ट्विट आहे, (हे ट्विटर अकाऊंट सीएम बोम्मई यांनी माझे नसल्याचे सांगत नाकारले) ''महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही''
बोम्मईंच्या विधानाने सांशकता वाढली
बोम्मईंनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली खरी परंतु या ट्विटनंतर सहा दिवस उलटले तरीही त्यावर ना कारवाई झाली ना जर ते अकाऊंट सीएम बोम्मईंचे नसेल तर त नेमके कुणाचे ट्विटर अकाऊंट आहे? या अकाऊंटचा हॅंडलर कोण? हे स्पष्ट झाले नाही. सत्ता, प्रशासन हाती असतानाही ही बाब अद्याप समोर येऊ शकली नसल्याने फेक ट्विटर अकाऊंटबद्दलच सांशकता वाढली आहे.
सीमावादाच्या संघर्षाचे खापर ट्विटवर!
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जतच्या ग्रामस्थांना प्रलोभन दिले. याशिवाय सीमाभागातील लोकांना कर्नाटकात यायचे आवाहनही केले. यानंतर त्यांनी काही विधाने करून वातावरण तापवले असे असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीमावादाच्या संघर्षाचे खापर थेट ट्विटरवरच फोडण्यात आले हे विशेष!
राऊतांनी घेतला समाचार
फेक ट्विटर अकाऊंट दिल्लीत समजले का? अशा शब्दात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुनावले. याशिवाय त्यांनी बोम्मईंच्या फेक ट्विटर अकाऊंटवर हल्लाबोल केला. ते म्हणाले. लखोबा लोखंडे सीमाभागातील होता. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचे फेक अकाऊंट दिल्लीत गेल्यावर त्यांना समजले का? ते आधी का समजले नाही. ट्विटमध्ये ते जे म्हटले ते जाहीरपणे माध्यमांशी बोलले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.