आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली अनेक दिवस राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि विरोधकांकडून त्यांचा निषेध वक्त करण्यात येत आहे. राज्यपालांच्या मुद्द्यावरुन हिवाळी अधिवेशन यंदा वादळी ठरु शकते, आतापर्यंत राज्यपालांनी काय काय वादग्रस्त वक्तव्य केली ते पाहूया.
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?
औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे.
आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असे शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचे सांगितले. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो, असे भगतसिंह कोश्यारी म्हटले होते त्यांच्या वक्तव्यानंतर मोठया प्रमाणात त्यांच्या विरोध झाल्याने त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी सारवासारव केली होती.
शिवाजी महाराज जुने आदर्श
राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या 62 व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या हस्ते डी.लिट. ही मानद पदवी देऊन गौरवले. त्या वेळी दोन्ही नेत्यांची स्तुती करताना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत गडकरी, पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ते म्हणाले, शिवाजी आता जुन्या युगातील आहेत. या राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत, असे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात विरोधकि आक्रमक झाले. यानंतरही त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे म्हणताच मविआने राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य
पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. यावेळीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… यावेळी दोन्ही गोष्टी बोलताना राज्यपाल मध्येच हसले होते. एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते.
नेहरुमुळे भारत कमकुवत
कारगिल विजय दिनाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित अशक्य ते शक्य कारगिल संघर्ष या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत, असे त्यांना नेहमी वाटायचे, देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पण त्यांची शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होते असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते.
यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशात अणुचाचणी झाली. खरेतर हे तंत्रज्ञान आपल्याकडे 20 वर्षांपासून होते. पण आधीच्या सरकारने अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणीमुळे भारतावर निर्बंध आले, पण वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आपली कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली असे म्हणत कोश्यारी यांनी काँग्रेस आणि नेहरु यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबईत काय राहिल
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलेच जाणार नाही.
दोन वर्षांनतर होणारे हिवाळी अधिवेशनामध्ये साच मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचे दिसून येत आहे. आता या मुद्द्यावरुन राजकारण तापणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.