आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांवर निश्चित कारवाई होईल:खासदार उदयनराजेंचा विश्वास, राज्यातील भाजप खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील भाजप खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाईची मागणी खासदारांनी केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निश्चित कारवाई होईल, अशी आशा खासदार उदयनराजेंनी व्यक्त केली.

26 खासदारांची उपस्थिती

पंतप्रधानांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत भेटीबाबत माहिती दिली. खासदार उदयनराजे म्हणाले, छत्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, असे निवेदन मी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. आजदेखील आम्ही तिच मागणी पंतप्रधानांकडे केली. जवळपास 26 खासदार आज बैठकीला उपस्थित होते. आजच्या बैठकिला खासदार धनंजय महाडिक, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, खासदार अनिल बोंडेही उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारींची अद्याप माफी नाही

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांबाबत अवमानजनक वक्तव्य करूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी अद्याप माफी मागितली नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. या पदावरील व्यक्तीने महापुरुषांबाबत भान ठेवून बोलायला हवे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. समाजात आणखी तेढ निर्माण करू नये, म्हणून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे उदयनराजे म्हणाले.

हटवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाची अस्मिता आहे. पंतप्रधान मोदींनीही पंतप्रधान होण्यापूर्वी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले होते. राज्यपालांना पदावरून हटवण्याची एक निश्चित अशी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया लवकरच सुरू होऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लवकरच पदावरून दूर होईल, अशी आशा उदयनराजेंनी व्यक्त केली. तसेच, भाजप खासदारांचे सरकार ऐकत नाही, असे म्हणणेही चुकीचे होईल, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

मविआच्या आंदोलनाचे स्वागत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात महाविकास आघाडीने मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. उदयनराजे म्हणाले, शिवराय हे सर्वांचीच अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे याला राजकारणाच्या दृष्टीने बघणे चुकीचे आहे. हा काही एका पक्षाचा विषय नाही. मविआने आंदोलन पुकारले असेल तर आपण त्याचे स्वागत करतो. मात्र, आंदोलनात सहभागी होणार की नाही, यावर उदयनराजेंनी स्पष्टीकरण दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...