आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो’च्या प्रतिसादाने राष्ट्रवादीला जाग आली:राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात काढणार शेतकरी दिंडी

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व काँग्रेस सुसाट चालले आहेत, आपला राष्ट्रवादी पक्ष तुलनेत पक्ष मागे पडत असून आपल्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन तीन महिन्यात होतील. त्यामुळे काही तरी चांगला कार्यक्रम हाती घ्या, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वपक्षनेत्यांचे गुरुवारी (ता.२४) कान टोचले. त्यानंतर बराच खल होऊन विदर्भात डिसेंबर महिन्यात शेतकरी दिंड काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

दर तीन महिन्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व आमदार, खासदार यांची बैठक होते. आज ती बैठक बेलार्ड पीअर येथील प्रदेश कार्यालायत झाली. त्यात राज्यातील विद्यमान स्थितीवर चर्चा झाली. काँग्रेसला भारत जोडो यात्रेमुळे मोठा लाभ होताना दिसत आहे, तर शिवसेनेला मुंबईत मराठी माणसांची मोठी सहानुभूती मिळताना दिसते आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचे संघटन मजबूत होताना दिसत असताना आपले पक्षसंघटनकडे दुर्लक्ष होत आहे, असे निरिक्षण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नोंदवले. मुंबईत काही करावे का असा पर्याय तपासून पाहिला. पण, मुंबईत पक्षाचे नेटवर्क नाही तसेच नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे हा पर्याय रद्दा केला. विदर्भात काँग्रेस अन भाजपला संधी निर्माण झाली आहे. तेथे आपण काही केले पाहिजे असा पर्याय पुढे आला. शरद पवार यांनी यावेळी ७० च्या दशकात काढलेल्या कापूस दिंडीची आठवण सांगितली. त्यानंतर विदर्भात शेतकरी दिंडी काढण्यावर बैठकीतील सर्वांचे एकमत झाले.

१९ डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर दिंडी काढण्याचे ठरले. त्याचा मार्ग व तारीख पुढच्या आठवड्यात निश्चित ठरणार आहे. त्यासाठी मुंबईहून २ नेत्यांना मार्ग निश्चितीसाठी विदर्भात पाठवणार आहे. या बैठकीचा अनेकांना उशिरा निरोप मिळाला.

पक्ष मागे पडत असल्याची जाणीव : शरद पवार
श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा नाही
मुख्यमंत्री शिर्डीला गेले ही आनंदाची गोष्ट आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करते. माझा श्रद्धेवर विश्वास आहे, अंधश्रद्धवर नाही. त्यामुळे जे कुठल्याही महत्त्वाच्या पदावर असतील, त्यांनी श्रद्धाही ठेवलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे.

बोम्मईप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : अजित पवार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्राने हस्तक्षेप करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनंती केली. बोम्मई यांच्या वक्तव्याचा गुरुवारी त्यांनी निषेध व्यक्त केला. पवार म्हणाले, ‘बोम्मई यांनी आपल्या राज्यातील जतमधील गावांचा समावेशाबाबत एक दिवस आधी सांगितले. गुरुवारी सोलापुरातील गावांबाबत तेच सांगितले. केंद्राने हस्तक्षेप करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना असे वक्तव्य करण्यापासून रोखावे. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे असतानाही ते विधाने करताहेत.’

बातम्या आणखी आहेत...