आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांच्या मर्जीने भारती विशेष पोलिस आयुक्तपदी:गृहमंत्र्यांवर समांतर प्रशासनाचा काँग्रेसचा आरोप

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले भारतीय पोलिस सेवेतील १९९४ च्या तुकडीचे अधिकारी देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. भारती यांच्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर नवे पद निर्माण करण्यात आले आहे. विशेष पोलिस आयुक्तपद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहील, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्त यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ या कालावधीत भारती हे मुंबई पोलिस दलातील सर्वात प्रभावी अधिकारी होते. फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून भारती ओळखले जातात. राज्यात २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. जून महिन्यात राज्यात सत्तांतर होऊन गृह खात्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर देवेन भारती पुन्हा चर्चेत आले होते.

शिस्तीच्या पोलिस दलात मोडतोड अयोग्य : लोंढे मुंबई पोलीस दलात आयुक्त हे सर्वोच्च पद असताना विशेष पोलिस आयुक्त नेमून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलिस दलात मोडतोड करून विशेष पोलिस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे. फडणवीस हे समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...