आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांना पुढे करून राजकारण करणारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणी काल ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अमित शहांची भेट घेऊन देवेंद्र फडणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाण्यात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे.
खासदार गृहमंत्र्यांकडे
खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, कृपाल तुमाने यांनी रोशनी शिंदे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नवी दिल्लीत भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहा उपस्थित नव्हते. तेव्हा त्यांनी अमित शहा यांच्या कार्यालयात निवेदन देऊन विरोधकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर भावना गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बदनामीचे सत्र सुरू
भावना गवळी म्हणाल्या की, रोशनी शिंदेचे प्रकरण त्यांनी लावून धरले. ते त्या ठिकाणी गेले. परंतु पोलिसांचा जो अहवाल आला आहे, त्यात असे काहीही झाले नाही. मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक ठिकाणी सरकारला बदनाम करायचे, एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचे. कोणी तरी सकाळी उठायचे. निवेदन करायचे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करायचे. अशा प्रकारची कारवाई विरोधी पक्षांकडून सुरू आहे. असे लोक जे खोटे बोलतात. त्यांची आधी चौकशी केली पाहिजे. त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा, ही मागणी मी माझ्या निवेदनामध्ये केली आहे.
म्हात्रे प्रकरणी बोला
भावना गवळी म्हणाल्या की, ज्यावेळेला शीतल म्हात्रेचे प्रकरण झाले, त्यामध्ये कोण सहभागी होते. हे निष्पण्ण झालेले आहे. त्याचा अहवाल हे का मागत नाहीत. महिला म्हणून त्या महिलेच्या पाठिसी हे का उभे राहिले नाहीत. आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे चांगले केलेले नाही. ही चुकीची गोष्ट केलेली आहे, असे का म्हणत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
आता महिला दिसते?
आता तुम्हाला महिला दिसते. शीतल म्हात्रे महिला नव्हत्या का? भावना गवळी महिला नव्हत्या? आमच्या यामिनीताई महिला नव्हत्या? असा सवाल भावना गवळी यांनी केला. तुम्ही आता महिलांना समोर करून राजकारण करता. कुणाला महाराष्ट्रभर फिरून भाषणे करायला लावता. त्या ठिकाणी येऊन निवेदन द्यायला लावतात. ही अत्यंत चुकीची बाब आहे. महिलांना समोर करून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.