आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्याचे आंदोलन:एका दिवसापुरते नव्हे, 365 दिवस चालणार भोंग्याचे आंदोलन-राज ठाकरे, मुंबईत 1,140 मशिदींपैकी 135 ठिकाणी अजान

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदींवरील भोंग्यांविरोधात सुरू केलेले आंदोलन केवळ एक दिवसाचे नसून जोपर्यंत भोंग्यांचा विषय निकाली निघणार नाही तोपर्यंत दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता.४) दिला. दरम्यान, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील भोग्यांच्या विरोधात हनुमान चालिसाचे पठण केले. मात्र, हे आंदोलन शांततेत पार पडले.

बुधवारी आपली भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईत आज ९० ते ९२ टक्के ठिकाणी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करताना त्या सर्व ठिकाणांच्या मौलवींचे ठाकरे यांनी आभार मानले. दरम्यान, मुंबईत १ हजार १४० मशिदींपैकी १३५ ठिकाणी अजान लाऊडस्पीकरवर झाल्याचे सांगतानाच यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यभरात आमच्याच बाबतीत धरपकड का होतेय ?
मुंबईसह राज्यात मंगळवार रात्रीपासून मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. त्याविरोधातील नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, नोटिसा, धरपकड असले प्रकार आमच्या बाबतीतच का होतात? कायद्याचे पालन करणाऱ्यांना शिक्षा देणार आणि कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक, असला हा प्रकार आहे. हे आंदोलन फक्त एक दिवसाचे नव्हते, तर ३६५ दिवस दररोज चार ते पाच वेळा भोंगा वाजतो तो बंद झाला पाहिजे.

कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेत राज यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा या भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले असतानाही भोंगे कसे काय वाजतात? न्यायालयाच्या निर्णयाचा अशा पद्धतीने अवमान केला जातो. यावर न्यायालय काय करते हेही मला पाहायचे आहे, असेही ते म्हणाले.

विषय श्रेयवादाचा नाही
मशिदीवरील भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. हा विषय श्रेयवादाचाही नाही, मला याचे श्रेयदेखील नको. केवळ मशिदीवरचेच नव्हे, तर मंदिरांवरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा, असेही स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
अटकेच्या भीतीने संदीप देशपांडे, संतोष धुरी पळाले

मुंबईतील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. पोलिसांनी त्यांना वाहनात बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच कार भरधाव निघून गेली. यादरम्यान एक महिला पोलिस जखमी झाली. दोघांनी पळ काढल्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...