आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मी भाजप सोडला अन् ईडीची कारवाई सुरू झाली : खडसे, भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली 8 तास चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
ईडीच्या कार्यालयात जाताना एकनाथ खडसे. - Divya Marathi
ईडीच्या कार्यालयात जाताना एकनाथ खडसे.

भोसरी भूखंड खरेदीची याआधी पाच वेळा चौकशी झाली आहे. यातून काही हाती लागले नाही. आणखी किती वेळा चाैकशी करणार? मी पक्ष बदलला अन ईडीची कारवाई सुरू झाली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. गुरुवारी खडसे मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचल्यावर माध्यमांशी बोलत होते. सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास ईडी कार्यालयात गेलेले खडसे रात्री ८:३०च्या सुमारास बाहेर पडले. सुमारे ८ तास त्यांची चौकशी झाली.

तत्पूर्वी, खडसे म्हणाले, ही चौकशी राजकीय हेतूने होत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. जसा मी पक्ष बदलला, तशा माझ्यावर कारवाया सुरू झाल्या. पण मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी रात्री ईडीने अटक केली. त्यांना १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी चाैधरी यांनी दिलेल्या माहितीवर खडसे यांची चौकशी करायची होती. त्यामुळे खडसे यांना बुधवारी समन्स बजावण्यात आले होते.

भाजपतून बाहेर पडले तर काय हाेते हे कळते : छगन भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, हा दबावतंत्राचा भाग आहे. भाजप सोडून बाहेर पडला तर काय होते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसेच अन्य पक्षांत असलेल्यांना त्रास देऊन आपल्या पक्षात आणायचे आणि त्यांचे सगळे गुन्हे माफ करायचा उद्योग भाजपने सुरू केल्याचा टोलाही भुजबळांनी लगावला. राजकारणात सध्या असे प्रयोग असले तरी खडसे आणि आम्ही सगळे मिळून निश्चितपणे योग्य उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र भोसरीच्या भूखंड खरेदीत बरेच बेकायदाही आहे, असा दावा या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

मी ईडीचा प्रवक्ता नाही : फडणवीस... “माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात मी काय बाेलणार, मी थाेडीच ईडीचा प्रवक्ता आहे,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया फडणवीस यांनी गुरुवारी नाशिक दाैऱ्यादरम्यान व्यक्त केली. खडसे यांच्या ईडी चौकशीबद्दल छेडले असता “मी ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल, तसेच कायदेशीररीत्या प्रक्रिया करण्यात काेणी अडचण करण्याचे कारण नाही,’ असाही चिमटा फडणवीसांनी घेतला.

बातम्या आणखी आहेत...