आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिढ्यानपिढ्या ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण समस्त भारतीयांनी बुधवारी अनुभवला. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन थाटात झाले आणि राज्यात सर्वत्र आनंद, उत्साहाला उधान आले. ठिकठिकाणी नागरिकांनी गुढ्या उभारून, दिवे पेटवून, तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला. काेराेनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेले नकारात्मकतेचे मळभ या साेहळ्याने काहीसे दूर हाेऊन सकारात्मकतेचे तेज आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी ट्विट करून आजच्या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. यात त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांना या यशाचे श्रेय दिले. देवेंद्र फडणवीस यांनी भक्तिगीत गाऊन, तर पंकजा मुंडे यांनी कुंचल्याने श्रीरामांचे चित्र साकारून आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आअयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची उभारणी थाटात सुरू झाली.
कोरोनाच्या संकटामुळे आज भलेही लाखो रामभक्त अयोध्येत जाऊ शकले नाहीत, पण प्रत्येकाचे मन आणि ध्यान आज फक्त श्रीरामाच्या चरणी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होतोय हीदेखील आनंदाची गोष्ट आहे. माझे संपूर्ण कुटुंब आणि अवघे जगच आज आनंदले आहे. प्रत्येक श्वास ‘जय श्रीराम’ म्हणतोय असे वाटतेय, अशी भावनाही लतादीदींनी व्यक्त केली.
फडणवीसांनी गायले भक्तिगीत
अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील भाजप कार्यालयात आपला आनंद साजरा केला. एक कारसेवक म्हणूनही ओळख असणाऱ्या फडणवीस यांचा आनंद या वेळी गगनात मावेनासा झाल्याचे एका व्हिडिओत दिसून येत आहे. व्हिडिओत ते रामनामाचा जप करत भक्तिरसात तल्लीन झाल्याचे दिसत आहेत.
कुंचल्यातून चित्र साकारत पंकजाने केले अभिवादन
भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रभू रामाला अनोखे अभिवादन केले. पंकजा यांनी त्यांच्या कुंचल्यातून प्रभू रामाचे चित्र रेखाटून अभिवादन केले. अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या घरात सहकुटुंब प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत अयोध्येतील भूमिपूजन सोहळा टीव्हीवरून पाहिला. तसेच एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला. त्याआधी पंकजा यांनी वॉटर कलर घेऊन कॅन्व्हासवर प्रभू रामाचे चित्र साकारले. हे चित्र साकारतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केला. तसेच प्रभू रामाची पूजा करतानाचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.