आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Big Corruption In Mumbai Municipal Corporation Inquire About Virtual Classroom Tender, BJP Mumbai President Adv. Ashish Shelar's Allegation

मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार:व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेची चौकशी करा, भाजप मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलारांचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिकेच्या 480 शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतच्या निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. या प्रकरणात मोठा घोळ असल्याचा आरोप करत त्यांनी चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर मुद्देसूद माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, व्हर्च्युअल क्लासरुम निविदेचा अभ्यास केल्यानंतर निदर्शनास येते की, या निविदेमध्ये ठेवण्यात आलेल्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत.

अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस

पुढे त्यांनी म्हटले आहे, ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचे दिसून येते आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच या कंपनीला काम दिल्याचे दिसून येते आहे. हे काम तांत्रिक असल्याने कामांचे तांत्रिक गुणांकन होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नसल्याचा उल्लेख त्यांनी केलाय.

कंपनी तांत्रिकदृष्टया सक्षम नाही

हे काम तांत्रिक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसोबत जोडलेले असल्यामुळे त्या विषयातील तज्ञ व तांत्रिक दृष्टया सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते. मात्र ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आले आहे ती कंपनी तांत्रिकदृष्टया अद्ययावत व सक्षम नाही. ज्या कंपनीला हे काम प्रस्तावित करण्यात आले आहे त्या कंपनीकडे या कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव नाही. त्यामुळे एकुणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो.

अधिकाऱ्यांमधील संभाषण उघड करु

निविदेबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि सदर कंपनीचे अधिकारी यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत आपल्याकडे प्रुफ असल्याचे शेलार यांनी या पत्रात म्हटले आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालणारे असून त्याबाबतच्या तक्रारी लाचलुचपत विभागकडे करण्यात आल्या त्यांनी म्हटले आहे.

फेर निविदा काढा

तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, आयटी विभागातील अधिकारी आणि सदर कंपनी यांच्यामध्ये संगनमत झाले आहे. त्यामुळे तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेर निविदा काढण्यात यावी अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

शेलारांचा थेट इशारा

हा विषय महापालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याने जर माझ्या या तक्रारीची दखल न घेतल्यास माझ्याकडे आलेली भ्रष्टाचाराची माहिती मला उघड करावी लागेल. त्यामुळे आपण या विषयाची गांभिर्याने दखल घ्यावी असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...