आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ, आमदार मनीषा चौधरी यांना मोठा दिलासा:मरीन ड्राइव्ह ठाण्यात दाखल गुन्ह्यातून दोषमुक्त; गिरगाव कोर्टाचे आदेश

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार मनीषा चौधरी, भारती लवेकर यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दोषमुक्त करण्यात आले आहे. गिरगाव 40 वी एमएम कोर्टात दंडाधिकारी एन.ए. पटेल यांनी आदेश पारित केले आहेत.

सप्टेंबर 2021चे प्रकरण

राज्यात सप्टेंबर 2021 मध्ये महिलांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन न घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली होती. मंत्रालय इमारतीच्या आवारात घडलेली ही घटना असून त्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह इतर दोघींनाही पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. तसेच या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही (पोलिस केस/119/2022) एफआयआर क्र. (25/2021) करण्यात आली होती. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत मुंबई पोलिस आणि ठाकरे सरकारवर टीका केली होती.

काय होते ते ट्विट?

"वा रे बहाद्दर मुंबई पोलिस..! भाजप कार्यकर्ते, नेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीच तुमची बहाद्दरी शिल्लक राहिली. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा. ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली आहे. ही षंढ सरकारची षंढ यंत्रणा, असे म्हणत त्यांनी खुले आव्हान दिले होते.
नेमकं प्रकरण काय ?

साकीनाका बलात्कार प्रकरणानंत राज्यात खळबळ निर्माण झाली होती. या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. या पत्राची चर्चा देशभर झाली. पीडितेवर बलात्कार आणि हत्येच्या या घटनेबद्दलच्या भयंकर परिस्थितीमुळे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यापालांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना केली होती.

राज्यपालांना पाठवले होते उत्तर

तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांच्या या पत्राला उत्तर देत या प्रकरणी संसदेनेच दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. युपी, गुजरात, बिहार, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटनांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर चार दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचे राज्यपालांना सुचवले होते.

चित्रा वाघ, चौधरी यांचे आंदोलन

ठाकरेंनी पत्राचे उत्तर पाठवल्यानंतर या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार मनिषा चौधरी, भारती लव्हेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर याच पत्राची होळी केली. त्यानंतर पाच महिन्यांनी या सर्व नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

नोटीस अन् गुन्हाही

मरीन ड्राईव्ह, मुंबई पोलीस ठाण्यातील महिला पोलिस उप निरीक्षकांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. तसेच गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर असल्या नोटीसांना आपण घाबरणार नाही असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...