आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर:'...कारण, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही', आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावरुन आता भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही? असे म्हणत शेलारांनी पलटवार केला आहे.

आशिष शेलारांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एका पाठोपाठ एक सवाल मुख्यमंत्र्यांना केले आहेत. 'गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का?, गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?, 114 टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?, मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?, मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?'

तसेच पुढे शेलार म्हणाले की, परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?, मुंबईत गेल्या 11 वर्षात 40 हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?, मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?, मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?, असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण…प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही? असा टोला आशिष शेलारांनी अखेरीस लगावला आहे.

नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
मुंबई महापालिकेच्या सुमारे 80 सेवासुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर एका संदेशाद्वारे आता मिळू शकतील. यासाठी पालिकेने व्हॉट्सअ‍ॅप कंपनीच्या सहकार्याने नवीन सुविधा विकसित केली आहे. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ या सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. 'काम न करताही बोलणारे लोक आहेत. पण आमचा कारभार उघड आहे. आम्ही काही लपवत नाही, महापालिका नेमकी काय आहे, कसे काम करते हे समोर यायला पाहिजे. शेवटी आपले काम बोलते. शंका घेणारे अनेक आहेत, मात्र प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही'. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...