आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल, तर लोकशाही काय चाटायची आहे का?, असे म्हणत नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून आज मुखपत्र सामनामधून ठाकरे गटाने भाजपवर शरसंधान साधले. मात्र, हे तर उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे आहेत, म्हणत भाजपकडून या अग्रलेखाला सविस्तर उत्तर देण्यात आले आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी एक पत्र काढून सामनाच्या अग्रलेखाला त्याच भाषेत उत्तर दिले. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा हा सावरकरद्रोह आणि महाराष्ट्रद्रोह असून, याचे उत्तर इतिहास घेईल, असा टोलाही हाणला.
बोरू बहाद्दर...
आशिष शेलार म्हणतात की, "वास्को द गामा" जग प्रवासाला निघाला तेव्हा आजचे बोरू बहाद्दर संजय असते, तर त्या वास्को द गामाला पण प्रभादेवीच्या गल्लीत बसून शहाणपण शिकवायला हे गेले असते किंवा त्याने बोटीला बांधलेल्या शिडाचा रंग कुठला असावा यावर निषेध पत्रक काढत बसले असते. कारण हे फक्त उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे आहेत. केवळ दुसऱ्याच्या घरातून फेकलेल्या पंगतीवरच्या पत्रावळीवरचे कावळे उपजीविका करतात.
औचित्यभंग सुरू
आशिष शेलार म्हणतात की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसदेची दिमाखदार नवी वास्तू उभी राहिली. कमीत कमी वेळात हे काम झाले. कमीत कमी खर्च, भूकंपासरख्या आपत्तीत टिकेल अशा वास्तूची हे निर्माण म्हणजे एक वास्तुशिल्पच ठरावे असे काम पूर्ण झाले. या आनंदाच्या क्षणी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी केले. पण औचित्य भंग करायचा असे ठरलेच होते, अशा कावळ्यांचा बहिष्काराचा कर्णकर्शक आवाज सुरू झाला. देशातील जनता हे ऐकतेय. जनता सुजाण आहे. ती निर्मितीच्या बाजूनेच उभी राहील. ती उद्ध्वस्तांच्या माकडचाळ्यांना फारसे स्थान देणार नाहीत.
सावरकरद्वेषाला खतपाणी
आशिष शेलार म्हणतात की, मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल आज एवढा आदर व्यक्त करणारे त्यांना राष्ट्रपती होताना विरोध करीत होते. त्यामुळे हा आदर बेगडी आहे. संसदेचा हा सोहळा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती दिनी 28 मे ला होतोय. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारतमातेच्या महान सुपुत्राला अशा प्रकारे पंतप्रधान अभिवादन करणार, त्या क्षणी सगळ्यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. पण काँग्रेसच्या सावरकरद्वेषाला खतपाणी घालून "उबाठा"ने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे उबाठाचा हा सावरकरद्रोह आणि महाराष्ट्रद्रोह आहे. याची नोंद इतिहास घेणारच आहे.
प्रतिक्रियावादी कावळे
आशिष शेलार म्हणतात की, खरं तर मुंबईतील नालेसफाईची कामंसुध्दा ज्यांना नीट जमत नाहीत अशांनी देशातील विषयांवर किती बोलावं आणि काय बोलावं याच्या मर्यादा आहेत. पण कावळ्यांना कसल्या आल्या मर्यादा ? दुसऱ्याच्या घरात काही बरं घडलं की यांनी कावकाव करायला सुरुवात केलीच समजा. केवळ प्रतिक्रियावादी कावळे. मुंबईच्या महापौरपदाचे टेंडर काढणाऱ्यांनी भाजपाला शिकवू नये संसदेचा उद्घाटन कार्यक्रम कसा करावा हे. त्यासाठी आम्ही सक्षम आहेत. तुम्ही दुधात कितीही मिठाचे कितीही खडे टाकलेत तरी हा सोहळा ऐतिहासिक, दिमाखदार होईल यात शंका नाही.
हा एक दैवयोगच
आशिष शेलार म्हणतात की, जे कुठल्याही पंगतीला बोलावले तरी आणि नाही बोलावले तरी ही केवळ औचित्यभंग करतात. ते या ऐतिहासिक क्षणाच्या पंगतीला नाहीत हा एक दैवयोगच म्हणावा का? आम्हाला सामनातून अग्रलेख लिहून शहाणपणा शिकवणाऱ्यांनो एका ऐतिहासिक क्षणी तुम्ही उष्ट्या पत्रावळ्या चाटत बसा... आमच्या तुम्हाला शुभेच्छा! शेवटी ज्याची जेवढी कुवत तेवढीच उंचीची पायरी त्याला मिळते. शिल्लक राहिलेली कावळ्यांची "पंगत" तरी भविष्यात टिको एवढीच आमची प्रार्थना!!
इतर बातम्याः
...तर लोकशाही काय चाटायची आहे का?; नव्या संसदेच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका
नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, राज्यातील काँग्रेस नेत्यांचे हायकमांडला साकडे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.