आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून मविआ सरकारने 220 वाहने खरेदी केली. त्यातील 121 वाहने पोलिस ठाण्यांना दिली आणि 99 वाहने स्वत:च इतर विभागांना वाटली, असा आरोप भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
निर्भया पथकाची वाहने इतर विभागांना महाविकास आघाडी सरकारनेच दिलेली असताना आताच्या सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या. अशी आणखी किती पापं करणार आणि ती कुठे फेडणार?, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
भाजपा कार्यालयात एका पत्रपरिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकाची वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली, असा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्याच काळात 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया निधीतून 220 वाहने खरेदी करण्यात आली. या 220 वाहनांपैकी 121 वाहने मुंबईतील एकूण 94 पोलिस ठाण्यांना देण्यात आली, तर 99 वाहने ही इतर विभागांना वितरित करण्यात आली,हे वितरण दि. 19 मे 2022 रोजी करण्यात आले.
चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वांत आश्चर्य म्हणजे 9 मंत्र्यांच्या दावणीत ही निर्भया निधीची वाहने देण्यात आली. तर, 12 वाहने व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आली. यात मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई इत्यादींचा समावेश होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यांसाठी सुद्धा याच निर्भया निधीतून घेण्यात आलेली वाहने वापरण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निर्भया निधीतील वाहन वापरायचे आणि इकडे मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका करायची, हा दुटप्पीपणा कशाला?
चित्रा वाघ म्हणाल्या, वस्तुत: निर्भया निधीतून खरेदी करण्यात आली असताना ती वाहने पोलिस विभागाने जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग इत्यादी विभागांना दिल्या. वाहतूक विभाग वरळीलाही 17 वाहने देण्यात आली. आदित्य ठाकरेंच्या वरळीवर विशेष लक्ष दिले गेले, हे ठीक. पण, निर्भया पथकाची वाहने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देताना तत्कालिन गृहविभागाला लाज वाटली नाही का? आता आमचे सरकार आहे, तर ही सर्व वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ती येत्या आठवडाभरात पूर्ण होईल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.