आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Bjp | Devendra Fadanvis | Vinod Tawde's Choice Is An Attempt To Cut Off The Wings Of Fadnavis; Rehabilitation Of Opposition Groups While Fadnavis Is In Trouble

तावडेंची नियुक्ती:विनोद तावडे यांची निवड म्हणजे फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न; फडणवीस अडचणीत असताना विरोधी गटांचे पुनर्वसन

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदेश भाजपचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील कट्टर विरोधक असलेले माजी आमदार विनोद तावडे (मुंबई) यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून रविवारी (ता. २१) नियुक्ती झाली. दोन वर्षे अडगळीत टाकलेल्या तावडे यांची महनीय पदावर नियुक्ती होणे म्हणजे फडणवीस यांच्या राज्यातील एकाधिकारशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

पंकजा मुंडे, अॅड. आशिष शेलार, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील विरोधक मानले जातात. त्याचा फटका या नेत्यांना मागच्या सहा वर्षांत बसला. तावडे आणि बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. अॅड. शेलार यांना मुंबईऐवजी ठाण्यात महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून पाठवले.

पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाला. पण आश्चर्य म्हणजे सध्या फडणवीसविरोधी गटातील नेत्यांच्या पुनर्वसनाचा सपाटा सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना चार दिवसांपूर्वी विधान परिषदेची उमेदवारी दिली. ध्यानीमनी नसताना तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपद लाभले. यापूर्वी प्रमोद महाजन या एकमेव मराठी नेत्याने हे पद भूषवलेले आहे. नितीन गडकरी हे दोन वेळा अध्यक्ष हाेते.

तावडे हे कोकणातील मराठा आहेत. मुंबईत शिवसेनेचा कणा मराठी माणूस आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेत तावडे यांची मोठ्या पदावर वर्णी लावल्याचा दावा केला जातो. मात्र हा दावा स्वत: तावडे यांनी फेटाळला आहे.

मुंबई महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. भाजपसाठी मुंबई महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. मात्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये ३३ वरून ८४ नगरसेवक केलेल्या अॅड. आशिष शेलार यांना बाजूला केले. पक्षात उपरे असणारे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना दिमतीला देत अतुल भातखळकर यांच्या हाती नेतृत्व दिले.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या एका संगीत चित्रफितीला अमली पदार्थ विक्रेता जयदीप राणा याने वित्तपुरवठा केल्याचा दावा मध्यंतरी राष्ट्रवादीने केला. त्यामुळे फडणवीस बॅकफूटवर आहेत. फडणवीस आपल्याविरोधातील निर्णय पूर्वी दिल्लीला जाऊन फिरवून आणत असत. सध्या फडणवीस हे आरोपांच्या कोंडीत आहेत.

भाजपत उपरे विरुद्ध निष्ठावंत संघर्ष

फडणवीस यांनी पक्षात उपऱ्यांचा भरणा केला. त्यांच्याकरवी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपल्याला हवी तशी यंत्रणा राबवली. परिणामी प्रदेश भाजपत उपरे आणि निष्ठावंत असा संघर्ष उभा राहिला. त्याची ओरड दिल्लीपर्यंत गेली होती. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फडणवीसविरोधी आहेत. त्यामुळे फडणवीसविरोधी गटाचे पुनर्वसन होत असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...