आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलगीतुरा:अडवाणींप्रमाणे खडसेंनाही ‘मार्गदर्शकमंडल’मध्ये टाकण्याची भाजपची तयारी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधान परिषद तिकीटवाटपावरून भाजपतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘मार्गदर्शक मंडल’मध्ये टाकण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तयारी केली आहे. अर्थात अडवाणी यांच्याप्रमाणेच खडसे यांनीही सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे असेच संकेत पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आले आहेत. खडसेंना पक्षाने खूप काही दिले. आता त्यांनी पक्षाला मार्गदर्शक म्हणून सेवा द्यावी, अशी अपेक्षा केंद्राची असू शकते, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचे सूतोवाच केले.

कट-कारस्थाने करून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावरून भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुध‌वारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर तोफ डागली. त्यानंतर पाटील-खडसे कलगीतुरा रंगला.

खासदार दानवे यांचा मुलगा अामदार, विखेंचा मुलगा खासदार : खडसे

रावसाहेब दानवे खासदार तर त्यांचा मुलगा आमदार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आमदार तर त्यांचा मुलगा खासदार आहे. पक्षाने मला संधी दिली, परंतु निवडून येण्याचे काम तर मी केले अाहे. माझ्या घरात केवळ मी अाणि माझी सून हे दाेनच जण राजकारणात अाहेत. मुलगी अाणि पत्नी या सहकारात त्यांच्या कर्तृत्वानेे काम करतात, असे खडसे म्हणाले.

पाटील यांना फडणवीस कसे दिसले नाहीत? त्यांचे वडील, काकू आणि ते स्वत: आमदार, मंत्री हाेते. मुळात चंद्रकांत पाटील हे पक्षात नवखे आहेत. भाजपबद्दल त्यांना शून्य माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली असेल. परंतु पक्षाने जे दिले ते उपकार नाहीत, मीदेखील पक्षासाठी खस्ता खाल्ल्या हे कसे विसरता ? असा सवालही खडेसंनी केला.

वादाचे मूळ : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना पक्षाने चारही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर खडसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागत : थोरात 

एकनाथ खडसे यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारल्यास त्यांचे पक्षात स्वागत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून ६ उमेदवार देणार होतो. त्यातील एका जागेसाठी खडसे यांना विचारणा केली होती, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी बुधवारी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

पत्नी ‘महानंद’ची अध्यक्षा, सुनेला तिकीट, मुलगी बँकेची चेअरमन

खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट द्यावे यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. राज्याच्या राजकारणात ते फार महत्त्वाचे नेते आहेत. मात्र त्यांना केंद्रातील वरिष्ठांनी त्यांचे तिकीट नाकारले. खडसेंना सात ते आठ वेळा संधी दिली. रावेरचे विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे घोषित केलेले नाव मागे घेऊन खडसे यांच्या सुनेला तिकीट दिले. त्यांची मुलगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची चेअरमन आहे. पत्नी ‘महानंद’च्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलासदेखील पक्षाने तिकीट दिले होते. यामुळे केंद्राने असा विचार केला असेल की किती द्यायचं यांना? आणि कितीही दिले तरी ते जाहीरपणे बोलतातच. त्यामुळे खडसे यांनी पक्षात एक वरिष्ठ कार्यकर्ता, एक मार्गदर्शक म्हणून काम करावे, असा विचार केला असावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काेरोनानंतर काँग्रेसमध्ये भूकंप :

थोरात यांच्या विधानावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेसच्या बुडत्या जहाजात नाथाभाऊ बसतील असे वाटत नाही. कोरोना संकटानंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे, काँग्रेसचे दोन तरुण नेते आणि एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये यायला तयार आहे.

खडसे यांच्यावर ही वेळ येणे ही शोकांतिका : नितीन गडकरी

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर ही वेळ येणे ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. खडसे यांचे पक्षाला यश मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्यावर अशी वेळ येणे याबाबत अधिक भाष्य करण्यापेक्षा मी फक्त दु:ख व्यक्त करू शकतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...