आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BJP Is Still Ready To Come Together With Shiv Sena For The Benefit Of The State; Chandrakant Patil's Claim Should Be Removed By Fadnavis

सत्तेची आस:राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबतएकत्र येण्यास भाजप आजही तयार; चंद्रकांत पाटील यांचा दावा, फडणवीसांनी काढली हवा

मुंबई, कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंपा...टरबुज्या...आता खपवून घेऊ नका, पलटवार करा; चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला
  • महाराष्ट्रासाठी ‘बिहारी’ फॉर्म्युला लागू करण्यासाठी भाजप उतावीळ

महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येण्यास तयार आहे, असे खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केले. आपल्या वक्तव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी बिहारचे उदाहरणही दिले. बिहारमध्ये लालू यादव यांना सोडून नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, असे ते म्हणाले. पाटील यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दाव्यातील हवा काढली. भाजपकडून असा कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, असा खुलासा केला. मात्र पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

केंद्रीय नेतृत्वाचा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य झाला तर...

‘राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वाने एखादा फॉर्म्युला तयार केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो मान्य झाला तर भाजप-शिवसेना एकत्र येऊ शकते. शिवसेनेला उपरती झाली तर ते आमच्याकडे येतील. आम्ही तसा कुठलाही प्रयत्न करणार नाही. आताही शिवसेनेला आमच्यासोबत सरकार स्थापन करायचे असेल तर आम्ही एकत्र येऊ. काँग्रेस व राष्ट्रवादीला बाजूला ठेवायचे असे उद्धव ठाकरे यांना वाटले तर केंद्रीय नेतृत्वाला ते तसे सांगतील. या भविष्यातील शक्यता आहेत,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

युतीचा प्रस्ताव नाही : फडणवीस

असा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला भाजपने दिलेला नाही वा शिवसेनेकडून असा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. राज्यातील सत्तेबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा पक्षपातळीवर नाही. येत्या काळात स्वबळावर लढायचे, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला उपरती झाली तर...

राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, या विधानामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. फडणवीस यांनी खुलासा केला. त्यानंतर पाटील यांनी ‘शिवसेनेला उपरती झाली तर ते भाजपकडे येतील. भाजप तसा कुठलाही प्रयत्न करणार नाही,’ अशी सारवासारव केली.

महाराष्ट्रासाठी ‘बिहारी’ फॉर्म्युला लागू करण्यासाठी भाजप उतावीळ

शिवसेना सोबत येण्याची शक्यता व्यक्त करताना पाटील यांनी बिहारचा दाखला दिला. “बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडने राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यांचे सरकारही स्थापन झाले. मात्र, त्यांचे जमले नाही आणि एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपला एकत्र घेऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातही तसे होऊ शकते,’ असे पाटील म्हणाले. एकूण पाटील यांच्या वक्तव्याने भाजप आता बिहारी फाॅर्म्युला लागू करण्यासाठी उतावीळ असल्याचे दिसतेय.

चंपा...टरबुज्या...आता खपवून घेऊ नका, पलटवार करा; कार्यकर्त्यांना सल्ला

कोल्हापूर । चंपा...टरबुजा...आता खपवून घेऊ नका, पलटवार करा. शांत बसणे म्हणजे मान्य करण्यासारखे आहे. सडेतोड उत्तर द्या, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत दिला. बैठकीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शांत बसणे म्हणजे मान्य करण्यासारखे आहे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.