आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच:कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने नको! मुश्रीफांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांला प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. किरीट सोमय्या फक्त साधन असून खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील आहेत असा घणाघात मुश्रीफ यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे.

ते म्हणाले की, कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. ईडीला फेस करताना तोंडाला फेस येईल. मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही
चंद्रकांत बोलताना पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये केवळ कोल्हापुर येत नाही. सोलापूरमध्ये भाजपचे दोन आमदार होते ते आता 8 झालेत. सांगली महापालिकेत महापौरपद गेलं. परंतु, आता स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष 56 ला मुख्यमंत्री 54 ला उपमुख्यमंत्री आणि 44 ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली, असे उत्तर चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना दिले आहे.

काय म्हणाले होते मुश्रीफ?
हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांसह चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली होती. ते म्हणाले होते की, गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करत आहेत. त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर शरद पवार, महाविकास आघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परमबीर सिंह प्रकरण, तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. यामुळे भाजप मला सातत्याने कसं दाबता येईल याचा विचार करत आहे. भाजपने सोमय्या यांना केवळ टूल म्हणून वापर केल्याचा टोलाही मुश्रीफांनी यावेळी लगावला होता.

बातम्या आणखी आहेत...