आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात राजकीय स्थलांतरे झाली होती. आता पुन्हा एकदा राजकीय स्थलांतराला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ आणखी एक भाजपचा महत्त्वाचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. भाजपचे कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
भाजपचे नेते कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. महत्त्वाचे म्हणजे आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू असेही यावेळी काळे म्हणाले. त्यामुळे काळे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी हे सरकोली येथे पोहोचले होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये कल्याणराव काळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात कल्याण काळे काय म्हणाले?
या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे काळे म्हणाले. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्या देखील काही चुका झाल्या मात्र त्यांनी कधीच दुजाभाव केलेला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांना म्हटले होते.
लोकसभा निवडणुकांपूर्वी कल्याण काळेंनी भाजपत केला होता प्रवेश
कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नाव आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला होता. तसेच कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. मात्र निवडणुकांच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते. काळे हे भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. यासोबतच ते सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापकही आहेत. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.