आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर स्मारक बनवण्याच्या नावाखाली सोमय्यांनी देशभरातील सामान्यांकडून 58 कोटी रुपये जमा केले. मात्र, ते पैसे मुलाच्या कंपनीत व निवडणुकीत लावले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावेत. गुन्हा सिद्ध झाल्यास मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे आव्हानच त्यांनी संजय राऊत यांना दिले.
आतापर्यंत सतरा आरोप केले, त्यांचे काय झाले?
शिवसेना खासदार संजय राऊत माझ्यावर दोन महिन्यांपासून सातत्याने आरोपच करत आहेत. त्यांनी माझ्यावर आतापर्यंत 17 आरोप केले. मात्र, त्या आरोपांचे काय झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मी कोट्यवधी रुपये अमित शहांना दिले. मी पीएमसी बँकेच्या माध्यमातून 426 कोटींचा घोटाळा केला. माझ्या मुलाच्या बांधकाम कंपनीनेही कोट्यवधींचा घोटाळा केला, असे अनेक आरोप राऊत यांनी माझ्यावर केले. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीड महिन्यापुर्वी एसआयटी स्थापन केली. मात्र, नंतर कोर्टात या आरोपांबाबत आपल्याकडे पुरावे नसल्याचे मुंबई पोलिस व ठाकरे सरकारनेच प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. त्यामुळे संजय राऊत हे केवळ आरोप करतात. त्यांनी या प्रकरणात तरी पुरावे समोर आणावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
राऊतांचे आणखी घोटाळे समोर आणणार!
संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केले म्हणून त्यांच्यावरील ईडी कारवाया थांबणार नाही. त्यांच्याविरोधात येत्या काही दिवसांत आणखी प्रकरणे समोर येतील, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला. संजय राऊत आता भाजपविरोधात आक्रमक झाले आहे का, असा प्रश्न विचारताच राऊत यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा, अशी स्थिती असते. त्यांच्याकडे आरोपांशिवाय दुसरे काहीही नसते. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे सोमय्या म्हणाले.
राजभवनाचे पत्र पुरावा नाही का? - संजय राऊत
आपल्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात संजय राऊत यांनी पुरावे दाखवावेत, या किरीट सोमय्या यांच्या आव्हानावर संजय राऊत यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली आहे. आयएनएस विक्रांत संदर्भात राजभवनात कोणताही निधी जमा झालेला नाही, असे पत्र आपल्याला राजभवनाच्या प्रशासकीय कार्यालयातून मिळाले आहे. राजभवनाचे हे पत्र पुरावा नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, किरीट सोमय्या या पत्राला पुरावा म्हणत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही दवाखान्यातून आपला मेंदू, डोके फुकट चेक करून घ्यावे. तुम्ही दाखवता ते पुरावे आणि आम्ही दाखवतो ते शेंगदाण्याचे दाणे का, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.