आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत गळाभेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने या संभ्रमात आणखीच भर टाकली. आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांना ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, असेही मुनगंटीवार म्हणाले. कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली. पण नंतर परत सोबत आले. आता पुढे बघू, असे मुनगंटीवार म्हणाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
उगीच राजकीय तर्क नको : शिवसेना नेता
सुधीर मुनगंटीवार हे लोकलेखा समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीचा उगीच राजकीय तर्क लावण्यात अर्थ नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
दिल्ली : जयंत पाटलांनी घेतली होती गडकरींची भेट
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिल्लीत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. राज्यातील विकासकामांबाबत चर्चा झाल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते.
मुंबई : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात भेटीगाठी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. यात विविध राजकीय पक्षांतील नेतेमंडळीही हजर होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.