आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...तर फिरणेही कठीण होईल':मुंबईतील राडाप्रकरणी राणेंचा शिवसेनेला इशारा, दसरा मेळावा शिंदेंचाच होणार असल्याचा दावा

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादरमधील प्रभादेवी येथील राडा प्रकरणावरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेला उद्देशून राणे म्हणाले, आम्ही या राड्याची दखल घेतली तर तुम्हाला मुंबईत चालणे, फिरणेही कठीण होईल. तसेच, शिंदे गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील आगामी दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, असा दावाही राणे यांनी केला.

प्रभादेवी राडा प्रकरणात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या आर्म्स अ‌ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेदरम्यान त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. नारायण राणे यांनी आज दादरमध्ये जात सरवणकरांची भेट घेतली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत. त्यामुळे दादरच्या घटनेबाबत त्यांची विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने त्यांची भेट घेतली.

मातोश्रीच्या दुकानातून तक्रारी

नारायण राणे म्हणाले, दादरमधील हाणामारी व गोळीबारप्रकरणी पोलिसांकडे दोन्ही गटांनी तक्रारी दिल्या आहेत. यावर आता पोलिस चौकशी करून खर काय घडलं ते सांगतील. पण, सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप असला तरी घटनेदरम्यान कुणीही गोळीबाराचा आवाज ऐकलेला आहे. मातोश्रीच्या दुकानात बसून आता काही जण केवळ तक्रारी करण्याचे काम करत आहेत. याप्रकरणात तेच झाले आहे.

...तर फिरणेही कठीण

राणे म्हणाले, मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे काळानुसार कळेल. आताही शिंदे गटाचे ४० आमदार सहज निवडून येऊ शकतात. दादरमध्ये जो धागडधिंगा घालण्यात आला आम्ही त्याची दखल घेत नाही. आम्ही दखल घेतली तर त्यांचे फिरणेही कठीण होईल. त्यांना शेवटी मुंबई, महाराष्ट्रात फिरायचे आहे.

दसरा मेळावा शिंदे गटाचाच

दसरा मेळाव्याच्या वादावरही राणे यांनी भाष्य केले. राणे म्हणाले, शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवतीर्थावर शिंदे गटाचाच दसरा मेळावा होईल. मुंबई पालिकेकडून शिंदे गटालाच परवानगी दिली जाईल, असा दावाही राणे यांनी केला.

लुटूपुटूची लढाई चालू देणार नाही

राणे म्हणाले, राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, असे काहीही होणार नाही. मुंंबईत लुटूपुटूची लढाई चालू देणार नाही. पोलिस याप्रकरणी आवश्यकक ती खबरदारी घेतील, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...