आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण दरेकरांची 3 तास चौकशी:मला अनेक उलटसुलट, नियमबाह्य प्रश्न विचारले, मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचे दिसत होते - प्रवीण दरेकर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल 3 तासांच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकर यांनी पोलिस ठाण्याबाहेर येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज तब्बल 3 तास चौकशी केली. स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार आज सकाळी साडे अकरावाजेच्या सुमारास प्रवीण दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तब्बल 3 तासांच्या चौकशींतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

तेच ते प्रश्न विचारून पोलिसांनी भंडावून सोडले!
चौकशीनंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर येताच प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.​ त्यांच्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते नितेश राणेदेखील उपस्थित होते. ​​​​ मुंबै बँकेच्या संचालक पदावर असताना काय लाभ घेतला, काही लाभ घेतला का, असे प्रश्न पोलिसांनी आपल्याला विचारल्याचे दरेकर यांनी सांगितले. तसेच, उलटसुलट, तेच ते प्रश्न विचारून आपल्याला भंडावून सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण आपली नियत साफ असल्यामुळे मी पोलिसांच्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे दिली, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले!
मुंबै बँकेच्या संचालकपदापुरताच आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या संस्थेपुरतेच प्रश्न विचारायला हवे होते. मात्र, पोलिसांनी अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले. इतर अनेक बँका, फेडरेशनसंदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आले. मात्र, या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे दिली, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच, चौकशीदरम्यान पोलिस उपनिरीक्षकांना सात वेळेस फोन आले. त्यानंतर ते अँटीचेंबरमध्ये जाऊन आले. चौकशीसाठी त्यांच्यावर दबाव होता, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला.

मोबाईल जप्त केला नव्हता!
दरम्यान, प्रवीण दरेकर चौकशीसाठी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात जाताच त्यांचा मोबाईल बंद झाला होता. त्यामुळे त्यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केले गेले. मात्र, प्रवीण दरेकर यांनी या वृत्ताचा इन्कार केला. पोलिस ठाण्यात गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्याने तो चार्चिंगवर लावला होता. त्यामुळे तो बंद ठेवला होता. पोलिसांनी मोबाईल जप्त केला नव्हता, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर होताना प्रवीण दरेकर.
चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर होताना प्रवीण दरेकर.

पूर्वी मी मजूरच होतो, आरोपांवर प्रवीण दरेकरांचे स्पष्टीकरण
मुंबै बँकेच्या संचालकपदी मजूर प्रवर्गातून बेकायदा निवडून आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी सहकार विभागनेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर होण्यापुर्वी या आरोपांवर प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी पुर्वी मजूरच होतो. मीदेखील अंगमेहनतीची कामे केली आणि नंतर मी श्रीमंत झालो, असे दरेकर यांनी सांगितले. या देशात धीरूभाई अंबानी यांनीदेखील सुरूवातीला पेट्रोल पंपावर काम केले होते. नंतर ते स्वत:च्या हुशारीने श्रीमंत झाले. श्रीमंत होणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल दरेकर यांनी केला आहे. तसेच, हे प्रकरण अत्यंत छोटे आहे. मी मजूर असल्याबाबत माझ्याकडे तलाठ्याचे कागदपत्रेही आहेत. मात्र, सरकारकडून पराचा कावळा केला जात आहे, असे दरेकर म्हणाले.

कुठेही गडबड करू नका, कार्यकर्त्यांना आवाहन
मी चौकशीदरम्यान पलिसांना सहकार्य करणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियेला मी सामोरे जाणार आहे. कार्यकर्त्यांनी कुठेही गडबड करू नये, असे आवाहनही दरेकर यांनी चौकशीला हजर राहण्यापूर्वी केले होते. राज्यातील अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र, विरोधकांविरोधात सरकारकडून सुडभावनेने कारवाई केली जात आहे. या सर्वांविरोधात आम्ही न्याय मागणार आहोत. आमच्यावर 100 गुन्हे दाखल केले तरी सरकारविरोधात आवाज उठवण्याचे आम्ही थांबवणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

दरेकरांना अटकेपासून आहे संरक्षण
दरम्यान, बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केल्यास अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामिनावर 29 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे दरेकरांच्या वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकरांना याप्रकरणात अटक करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आज प्रवीण दरेकर यांची केवळ चौकशी होणार आहे. मुंबई पोलिस त्यांना अटक करण्याची शक्यता फार कमी आहे.

सर्वप्रथम आम आदमी पक्षाने केली होती तक्रार
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर मजूर या प्रवर्गातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर नेमकी कुठे मजुरी करतात, असा सवाल करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागानेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यामुळे दरेकर यांना संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रवीण दरेकर तब्बल 20 वर्षे संचालकपदावर होते. म्हणून त्यांनी सरकारची तब्बल 20 वर्षे फसवणूक केली, असा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...