आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांचे वेध:‘ऑपरेशन लोटस’च्या परिणामांवर भाजपचे मंथन; कर्नाटक निकालाने महाराष्ट्र अलर्ट; भाजप, आघाडीत बैठकांचा धडाका

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा मोठा पराभव झाला, तर देशात पिछाडीवर असलेल्या काँग्रेसला येथील जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. शेजारी राज्यातील या निकालाने वर्षभरावर लोकसभा-विधानसभा निवडणुका आलेल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षही खडबडून जागे झाले आहेत. प्रदेश भाजपने पुढील रणनीती ठरवण्यासाठी दोन दिवसांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे, तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते पुढील आठवड्यात आगामी रणनीती ठरवण्यासाठी एकत्र बैठक घेेणार आहेत.

कर्नाटकात भाजपने २०१९ मध्ये विरोधी आमदारांची फोडाफोडी केली होती. काँग्रेसच्या १५ व जेडीएसच्या २ आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडून काँग्रेस-जेडीएसचे सरकार पायउतार केले होते. दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही भाजपने तसेच ‘आॅपरेशन लोटस’ घडवून महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले. फोडाफोडीचे हे राजकारण कर्नाटकच्या जनतेला आवडले नाही. परिणामी, भाजपचा तिथे मोठा पराभव झाला. हीच परिस्थिती महाराष्ट्रातही उद‌्भवू शकते, असा दावा विरोधी गटातील मविआचे नेते करत आहेत.
कोर्टाचे ताशेरे, काँग्रेसच्या विजयाच्या मुद्द्यावर भाजपला घेरणार मविआ
1. भाजपचे नेते सतर्क
शिवसेनेचे ४० आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता पुन्हा मिळवली. पण दीड वर्षाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकची राज्यात पुनरावृत्ती होण्याची या पक्षाला धास्ती आहे. त्यावर विचारमंथन करण्यासाठी दोन दिवसांनी कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत आॅपरेशन लोटसची परिणामकारकता व त्यावरील उपायांवर मंथन होणार आहे.

2. शरद पवार अॅक्टिव्ह
राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांनी निवडणुकांच्या तयारीत लक्ष घातलेय. आतापर्यंत उमेदवार निवडीत अजितदादांचा वरचष्मा असे. पण आता स्वत: पवारांनी सूत्रे हाती घेतलीत. ‘फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडत नाही. कर्नाटकात जनतेने हे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांचे बंडही कुणालाच रुचलेले नाही. म्हणून जनतेचा कौल भाजपविरोधात जाईल,’ असे सांगून पवारांनी आपल्या प्रचाराचा अजेंडा जाहीर केला.
मविआच्या समन्वयासाठीही पवारांनी पुढाकार घेतलाय. येत्या तीन दिवसांत आघाडीची बैठक घेण्यासाठी ते उद्धव ठाकरेंशी बोललेत.

3. काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला
कर्नाटकातील विजयाने प्रदेश काँग्रेसमध्येही आत्मविश्वास वाढलाय. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या भागात गेली तिथे पक्षाने जास्त जागा जिंकल्या. त्याच धर्तीवर राज्यातही जिथे गांधींचा दौरा झाला त्या मराठवाडा-विदर्भात काँग्रेसने लक्ष केंद्रित केेले आहे. स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा कर्नाटक पॅटर्न इथेही राबवला जाणार आहे. मविआ एकसंघ राहिली तरच यश हे पटल्याने मित्रपक्षांशी जुळवून घेईल, असे नेतृत्व प्रदेश काँग्रेसला देण्याच्या हालचाली आहेत.

4. उद्धव सेनेची रणनीती
सुप्रीम कोर्टाने राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांना फटकारले आहे. याच मुद्द्याचे भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे नियोजन उद्धवसेनेने केले आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई व दुसरीकडे जनतेच्या न्यायालयात जाऊन भाजपविरोधी आक्रमक प्रचार असे नियोजन ठाकरे गटाने केले आहे. याचसाठी उद्धव ठाकरेंनी शनिवारी आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
‘मातोश्री’वर पुढील आठवड्यात आणखी एक बैठक होईल. तीत भाजपविरोधी प्रचाराची रणनीती नेत्यांना समजावून सांगण्यात येईल.
कोर्टाचा निकाल व विकासकामांच्या धडाक्यातून सरकारची व पक्षाची प्रतिमा उजळवण्याची रणनीती ठरवण्यावर भाजपचा भर.