आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:प्रदेश भाजपच्या बैठकीला राष्ट्रीय नेत्यांना कसे बाेलावणार? पंकजांना डावलून ओबीसी माेर्चाची बैठक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप ओबीसी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
भाजप ओबीसी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस.
  • ओबीसी आरक्षण : आघाडी सरकारचा वेळकाढूपणा : फडणवीस यांचा आरोप

मुंबई येथे सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ झाला. आश्चर्य म्हणजे पक्षात ओबीसींचे नेतृत्व करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला अनुपस्थित होत्या. पंकजा यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ओबीसी हा भाजपचा मूलाधार आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दादर येथील “वसंत स्मृती’मध्ये सोमवारी ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, अॅड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संगमलाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते. अोबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपकडून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती ओबीसी लढ्याचा सुकाणू दिलेला आहे. मात्र सोमवारच्या बैठकीला हे दोन्ही नेते गैरहजर होते. पंकजा मुंडे यांना ओबीसी माेर्चाच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते अशी माहिती मिळाली.

प्रीतम मुंडे यांना डावलल्याने अस्वस्थ : पंकजा सध्या पक्षात बॅकफूटवर आहेत. परळीतून विधानसभेला पराभूत झाल्यावर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र ती पंकजा यांच्याएेवजी वंजारी समाजाचे रमेश कराड यांना देण्यात आली होती. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यातही पंकजा यांची बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी अस्वस्थतेचे संकेत दिले होते.

पंकजा राष्ट्रीय नेत्या म्हणून निमंत्रण नाही...
पंकजा मुंडे यांना बैठकीचे निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते,असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मात्र ही बैठक प्रदेश कार्यकारिणीची होती अन् पंकजा या ‘राष्ट्रीय नेत्या’ आहेत, म्हणून त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे ओबीसी मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. पंकजा मुंडे यांनी मुंबईत नुकताच समर्थकांचा मेळावा घेतला होता.या वेळी मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख टाळला होता, हे येथे उल्लेखनीय.

इतर नेत्यांना बळ : राज्यात भाजपचा पाया विस्तारण्यासाठी वसंतराव भागवत यांनी ‘माधवं’ (माळी, धनगर, वंजारी) हा फाॅर्म्युला दिला. तो यशस्वी करण्याचे कार्य पंकजा यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. मात्र सध्या पंकजा यांच्या पक्षातील ओबीसी नेतृत्वाला पर्याय म्हणून इतर नेत्यांना बळ दिले जाते आहे, असा आरोप पकंजा यांच्या समर्थकांचा आहे.

पंकजांच्या अनुपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये
भाजपचे अनेक सेल आहेत. त्यापैकी ओबीसी मोर्चा एक आहे. त्याच्या कार्यकारिणीची बैठक होती. त्यामुळे पंकजा मुंडे बैठकीला नव्हत्या. यातून राजकीय अर्थ काढायची गरज नाही, असे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

ओबीसी आरक्षण : आघाडी सरकारचा वेळकाढूपणा : फडणवीस यांचा आरोप
‘आघाडी सरकारला सारे माहिती आहे. तरीही इम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा असा ठराव विधानसभेत केला. या षड‌्यंत्रामागे कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

वसंत स्मृती येथे सोमवारी पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यात फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले असून ओबीसी समाजासाठी केंद्राने अनेक योजना सुरू केल्या आहेत. संघटित ओबीसी समाज निर्माण करणे आणि त्यातून समाज अधिक सक्षम करणे हे भाजपचे अंतिम ध्येय आहे, असा दावा करुन जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या ओबीसींच्या प्रभागात ज्या फेरनिवडणुका जाहीर झाल्या आहेत, तेथे भाजपने केवळ ओबीसी समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण यातून माघार नाही’,

‘मराठा आरक्षणासाठी ४ महिन्यात आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा केला. हा डेटा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला. परवा मंत्री छगन भुजबळ येऊन गेले. मी त्यांना ओबीसी आरक्षणप्रश्नी सहकार्य करीन, असे सांगितले आहे. काम करायचेच असेल तर ते सहज शक्य आहे’, असा दावा त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...