आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका करत भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?, असा सवाल केला आहे.
प्रवीण दरेकरांनीही शांतपणे ऐकून घेतले
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन करता आमदार प्रसाद लाड यांनी हे चुकीचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यांच्या बाजुलाच भाजप नेते प्रवीण दरेकर बसले होते. तेदेखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत. प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्यानंतर समोर बसलेल्या काहींनी कुजबूज करत शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे लाड यांना सांगून पाहीले. मात्र, त्यानंतरही लाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला नाही की त्याची दुरुस्ती केली नाही.
म्हणे रायगडावर बालपण गेले
उलट नंतर सारवासारव करताना शिवरायांचे बालपण कोकणात गेले. रायगडावर गेले. येथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, असे अकलेचे तारे आमदार प्रसाद लाड यांनी तोडले. आश्चर्यजनक म्हणजे त्यांच्या बाजुला बसलेल्या प्रवीण दरेकरांसह एकाही भाजप नेत्याने, पदाधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही.
आमदारांना इतिहासाचे धडे द्या!
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांचा हा व्हिडिओ ट्विट करून भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे.
अवमानाची सुपारी घेतलीये का?
प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याने आता राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले" .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?
पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्या
मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनीही प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. विनोद पाटील म्हणाले, प्रसाद लाड यांनी आता पुन्हा शाळेत अॅडमिशन घेऊन इतिहासाचे धडे घेण्याची गरज आहे. त्यांनी पहिलीच्या मुलाला शिवरायांचा जन्म कुठे झाला, हे विचारले असते तर त्यानेही अचूक उत्तर दिले असते. एखादा मनोरुग्णच असे वक्तव्य करू शकतो.
विकृत मानसिकतेचे मनुवादी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, प्रसाद लाड जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. भाजप आणि आरएसएस (RSS) ची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.