आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन:राम मंदिरासाठी गोळा होणारा निधी भाजप, संघ लुबाडतील; प्रदेश काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्यही निधी देऊ लागल्याने काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ : भाजप

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजप व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून हा पैसा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला.

यासंदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, भाजप व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी आणि अनेक क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती. ४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपतर्फे राम मंदिर निर्मितीकरिता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे.

या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत, त्या चिंताजनक आहेत. श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीच्या मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरिता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लूट होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये म्हणून भाजप-आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही याची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली.

सामान्यही निधी देऊ लागल्याने काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ : भाजप

राम मंदिरासाठी सामान्य माणूसही स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे, त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरित निधी देणाऱ्याकडे सुपूर्द करीत आहेत. ज्या काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराॅल्ड गैरव्यवहारप्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. हा निधी नॅशनल हेरॉल्डप्रमाणे अन्यत्र वळवला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असे प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...