आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ७६८२ ग्रामपंचायतींत थेट सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी मतदान झाले. त्याचा निकाल मंगळवारी झाला. यापैकी ६९९ गावांचे सरपंच यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर ६३ गावांमध्ये सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नव्हता, म्हणून तिथे मतदानच झाले नव्हते. काही गावांत तांत्रिक अडचणीमुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्हीच नंबर वन असल्याचे स्वतंत्र दावे भाजप-शिंदेसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते, भाजपचे २३४८ तर शिंदेसेनेचे मिळून ३१९० सरपंच विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीला २६५१ गावांत यश मिळाल्याचा दावा केला आहे. भाजपचा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.
६९९ सरपंच बिनविरोध, ६३ गावांत निवडणूकच झाली नाही
राज्यात नंबर वनचा दावा बालिशपणा : उद्धव ठाकरे
ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक गावकरी, अनेक पक्षांचे कार्यकर्तेही एकत्र येऊन लढवतात. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरून कोणताही पक्ष नंबर वनचा दावा करत असेल तर तो बालिशपणा आहे. आम्ही समाधानी असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
आमच्या सरकारला पसंती : देवेंद्र
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपला राज्यात २३४८ ग्रामपंचायतीत तर बाळासाहेबांची शिवसेनेला ८४२ जागी यश मिळाले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या. या विजयाबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे अभिनंदन करतो. आमच्या सरकारवर जनतेने पसंतीचा शिक्का उमटवला आहे.
विदर्भात काँग्रेसच वरचढ : पटोले
काँग्रेसचे ९०० पेक्षा जास्त सरपंच विजयी झाले, महाविकास आघाडीच राज्यात नंबर वन आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसला यश मिळाले. भाजपला ३६ जागाही तिथे मिळाल्या नाहीत. भाजप विजयाचे खोटे दावे करते. विधान परिषद निवडणुकापांसून विदर्भात भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे, असे आमदार पटोले म्हणाले.
ग्रामीण जनता पाठीशी : पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘आमच्या पक्षाला १३०० तर महाविकास आघाडीला २६५१ ग्रा.पं. मध्ये यश मिळाले आहे. आघाडीला ग्रामीण मतदारांनी मोठी साथ दिली. साम- दाम- दंड- भेद वापरणाऱ्या भाजप व शिंदे गटाचा जनतेने पराभव केला. पूर्ण निकाल लागल्यावर जागांचे अंतर अजून वाढत जाईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.