आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानांचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान आणि त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे हा घटनाक्रम लक्षात घेता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केले असून नरेंद्र मोदी आणि भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (७ जानेवारी) केला.
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता, असा सवालही पटोले यांनी भाजपला केला आहे. काँग्रेसच्या डिजिटल सदस्यता नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आज टिळक भवनमध्ये पार पडला. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पटोेले म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच. भाजपकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपने अमित शहा यांच्या घरासमोर आंदोलन करावे
पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते. अनेक महत्त्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ जे लोक गेले होते ते भाजपचे कार्यकर्ते होते. तेथे “नरेंद्र मोदी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या, असे पटोले म्हणाले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक केलेली चूक कटाचा भाग : भाजप
पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब येथील दौऱ्यादरम्यान पंजाब सरकारने जाणीवपूर्वक चूक केली असून हा एका मोठ्या कटाचा भाग आहे, अशी टीका शुक्रवारी खासदार प्रकाश जावडेकर यांनी केली.
भाजप पुणे शहराच्या वतीने गांधी पुतळ्यासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये घडलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये झालेल्या चुकीविरोधात निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यांची सुरक्षा ही नागरिकांची व देशातील सर्व राज्यांची जबाबदारी आहे, असेही जावडेकर म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या मार्गात पंजाबमधील काँग्रेस सरकारने नियोजनबद्ध अडथळे निर्माण केले आणि त्यांच्या सुरक्षेशी खेळ केला, असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी केली चाैकशीची मागणी
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडले त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले शुक्रवारी (ता.७) ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे पंजाबात सरकार असून काँग्रेस महाराष्ट्रात सेनेबरोबर सत्तेत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.