आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेथेही आंदोलन होत असेल तेथे शांतता राखा आणि इस्लाम समाज शांतताप्रिय आहे हे दाखवून द्या असे आवाहन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केले. तर नुपुर शर्मा, नवीन जिंदल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपला देशात दंगली घडवायच्या आहेत असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला.
भाजपमधून नुकतेच सहा वर्षांसाठी निलंबित केलेल्या नुपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दूखावतील असे वक्तव्य केले. त्यामुळे आज देशभरात या वक्तव्याचे पडसाद उमटत असून दोघांनाही अटक करावी अशा मागणीसाठी मुस्लिम संघटनांनी आंदोलन पुकारले. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.
नुपुर शर्मांवर कारवाई का नाही?
इम्तियाज जलील म्हणाले की, नुपुर शर्मांनी ज्या पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना भडकल्या आहेत. सरकार मात्र यावर गप्पच होते. त्यानंतर जगभरातून पडसाद उमटल्यानंतर नुपुर शर्मांवर कारवाई केली गेली. मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींवर जेलमध्ये लोकांना टाकले जाते पण नुपुर शर्मांवर कारवाई केली गेली नाही असा सवालही त्यांनी केला. देशातील वातावरण गढूळ व्हावे असे काही लोकांना वाटते असेही सय्यद इम्तियाज म्हणाले.
आंदोलनात नशेखोर असल्याचा दावा
इम्तियाज जलील म्हणाले की, आंदोलनात नशेखोर आले होते, त्यांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आंदोलकांना समजावत त्यांना माघारी पाठवले आहे.
नुपुर शर्मा यांना फाशी व्हावी -इम्तियाज
इम्तियाज जलील म्हणाले, नुपुर शर्मा यांना फाशी व्हावी असे मला वाटते, त्यांच्यावर केंद्राने ठोस कारवाई करावी असेही ते म्हणाले. ज्यांनीही हे आंदोलन पुकारले त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की माईकची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. माईकद्वारे लोकांना शांततेचे आवाहन करताना अडचणी आल्या अशा आयोजकांवरही गुन्हा दाखल व्हायला हवे असेही ते म्हणाले.
कोण व्यक्ती आंदोलनात आले आणि त्यांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यामुळे शहरातील वातावरण खराब होऊ शकते आणि त्यामुळे समाजाचीही बदनामी होऊ शकते असेही ते म्हणाले.
कायदा बनवायला हवा
धर्माबाबत वक्तव्य करणाऱ्यांबाबत कायदा करायला हवा. राज्य सरकारच्या हातात आहे की, नुपुर शर्मा यांना कधी अटक करायची हे राज्य सरकारच्या हाती आहे आणि त्यांना लवकरच अटक व्हावी अशी आमची मागणीच आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत यांनी आरोप केला की, भाजपला महाराष्ट्रात दंगली घ़डवायच्या आहेत. या पुर्वी देशात अशी स्थिती कधीच आली नव्हती. जगभरात आपला निषेध सुरु आहे. जगभरात भारतीय उत्पादनावर बंदी आणली गेली.
देशाच्या इभ्रतीचा सवाल- भाई जगताप
काॅंग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, अशा वक्तव्यामुळे देशाच्या इभ्रतीचा सवाल उपस्थित झाला आहे. जगभरात देशाच्या मालावर बहिष्कार टाकला जात आहे. केंद्राने याकडे लक्ष घालावे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.