आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) १६ भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरु असताना या प्रकरणात भाजपही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. भाजपच्या तीन आमदारांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुमारे दीड महिन्यापूर्वीच ( ४५ दिवस) तारांकित प्रश्न टाकल्याचे बुधवारी उघड झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रवीण दटके आणि नागोराव गाणार हे विदर्भातीलच आमदार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे एखादे अनियमितता,गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आणले जाते. या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी २०१९ मध्ये नगरविकास मंत्री म्हणून घेतलेल्या नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) च्या १६ भूखंडाच्या निर्णयाचे प्रकरण गाजते आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तर विधान सभेत छगन भुजबळ यांनी हे प्रकरण लावून धरले. सलग दोन दिवस या मुद्द्यावरुन विधिमंडळात गदारोळ झाला आहे.
काय आहे प्रकरण ? : नागपुर प्रन्यास सुधारचे १६ भूखंड जे ८३ कोटीचे होते, ते अवघ्या २ कोटींना दिल्याचा आरोप आहे. या मागे मुख्यमंत्री शिंदे यांचा निकटवर्तीय नागपूरचा एक ठेकेदार असल्याचे सांगण्यात येते. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठेकेदाराने मुंबई आणि नागपुरात फार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीवर खर्च केला होता.
सीएम-डीसीएम सुप्त संघर्ष, बावनकुळेंनी व्यक्त केली होती इच्छा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यावेत, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली हाेती. आता तर खुद्द बावनकुळेंसह भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रकरण चव्हाट्यावर आणण्यासाठी ४५ दिवसांपूर्वी तारांकित प्रश्न टाकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चर्चा खऱ्या असल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.