आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी वाटपात दुजाभाव नाही:उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारच्या कायम पाठिशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निधी वाटपात कसलाही दुजाभाव केलानाही. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचा अजून तरी कोणता रोल असल्याचे दिसत नाही. सोबतच या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाहीत, तसा त्यांचा स्वभाव नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही बैठक घेतली. यानंतर राष्ट्रवादीची भूमिका नेते अजित पवार यांनी आज माध्यमांसमोर स्पष्ट केली.

आम्हाला सांगायला हवे

अजित पवार म्हणाले, आमचे मित्रपक्ष वेगळी वक्तव्य करीत आहेत. सरकार अडीच वर्षांपुर्वी आले तेव्हा छत्तीस पालकमंत्री नेमले. त्यांना निधी देताना गेल्या अडीच वर्षात निधीला काटछाट केली नाही. निधीवरून माझ्यावर आरोप होत आहे ते चुकीचे आहे. मी कधीही दुजाभाव केला नाही. उलट विकास कामात सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली. मी रोज कार्यालयात येऊन प्रश्न सोडवण्याचे काम करीत आहे. महाविकास आघाडीची चर्चा होते, तेव्हा समज गैरसमज दूर करता आले असते. त्यांनी माध्यमांसमोर सांगणे योग्य नव्हते असेही ते म्हणाले.

राऊतांवर टीकेची गरज नाही

अजित पवार म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य मी ऐकले त्यांनी ते वक्तव्य का केले हे मला माहीत नाही, पण त्यावर आम्हाला टीका टिप्पणी करण्याचे कारण नाही. संकटातून व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मी उद्धव ठाकरे यांना विचारेल की, संजय राऊतांनी असे वक्तव्य का केले. आमदारांना परत आणण्यासाठी राऊत यांनी तसे वक्तव्य केले असावे..

भाजपला दिली क्लिन चिट

अजित पवार म्हणाले, सद्यस्थितीतील राजकारणात उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि पक्ष सरकार चालवण्यासाठी पुढाकारच घेत असून आम्ही मागे हटणार नाही. अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला की, एकनाथ शिंदेंच्या बंडात भाजपचा हात आहे काय? त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट केले की, शिंदेंच्या बंडात अजून तरी मला भाजपचा रोल आहे असे दिसत नाही. आम्ही शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांना साथ देणार आहोत आम्ही शिवसेनेचा पाठिंबा काढणार नाही, कोणत्याही स्थितीत सरकार अबाधित ठेवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.