आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. हातकणंगले (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी पाटील बोलत होते.
याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, गेले काही दिवस अनेक सदस्य आमच्याशी चर्चा करत आहेत. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत. तेथे त्यांना उबग आलेला आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. लवकरच आमच्याकडून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या दाव्यास होकार दिला. भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करून घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज आवळे यांच्या प्रवेशाने होत असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. २०२१ मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ग्वाही आवळे यांनी दिली. आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते रामभाऊ सूर्यवंशी, कबनूरचे भाजप नेते सुधाकर कुलकर्णी, भाजपचे नितीन कामत यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला.
पवार साहेबांसारखा नेता देशात दुसरा नाही : उपमुख्यमंत्री
पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवार साहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. राजकीय जीवनात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करत आहोत. यापुढेही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभेल, असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.