आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज शनिवारी मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षासाठीचा 52,619.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.52% जास्त आहे. कारण मुंबई महापालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प 45,949.21 कोटी रुपये होता.
मुंबई महापालिकेला चालू आर्थिक वर्षात 30743.61 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज होता. ज्यामध्ये सुधारणा करून 28887.63 कोटी रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अंदाजित महसुली संकलनात 1855.98 कोटी रुपयांची घट झाली आहे. डिसेंबर 2022 पर्यंत, मुंबईला 18769.28 कोटींचा प्रत्यक्ष महसूल मिळाला होता. 2023-24 मध्ये मुंबईला 33290.03 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 2546.42 कोटी रुपये जास्त आहे.
जोडरस्ता प्रकल्पासाठी 1060 कोटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडसाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये यंदा 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पाला 2650 कोटी रुपये मिळाले होते. यासोबतच गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी (जीएमएलआर) 1060 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विविध मोठ्या कामांवर एकूण 27247.80 कोटी भांडवली खर्च करण्याची तरतूद आहे.
रूंद रस्त्यांवर फूटपाथ
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी अर्थसंकल्पात मुंबईतील सर्व नऊ मीटरपेक्षा जास्त रूंद रस्त्यांवर फूटपाथ बनवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. त्यांनी मुंबईत वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 2825.06 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टिळक पूल (दादर), रे रोड रेल्वे पूल आणि भायखळा पूर्व पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात 2100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आले आहे. मिठी नदीच्या रूंदीकरण व खोलीकरणाचे 95 टक्के काम आणि संरक्षण भिंत बांधण्याचे 85 टक्के पूर्ण झाल्यामुळे मिठी नदीची धारण क्षमता आणि वहन क्षमता तीन पटीने वाढलेली आहे. ही माहिती देताना महापालिका आयुक्त चहल यांनी मिठी नदी पॅकेज-2 आणि पॅकेज-3 च्या कामांसाठी बजेटमध्ये 654.44 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.
पाणी तुंबू नये म्हणून...
यंदा मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोठ्या नाल्यांसाठी 90 कोटी, लहान नाल्यांसाठी 90 कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 46 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध भांडवली कामांकरिता 2570.65 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. तसेच "हिंदूह्यसम्राट बालासाहेब ठाकरे- आपला दवाखाना" साठी अर्थसंकल्पात 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबईतील विविध धर्मांच्या स्मशानभूमींच्या सुशोभीकरणासाठी १.४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबईकरांना डासांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कीटकनाशक फवारणी आणि फॉगिंगसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध प्रसूतिगृहांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1680.19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.