आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजप गुरुवारी (९ डिसेंबर) आमने-सामने आले. पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेना खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आगामी महापालिका निवडणुकीतील संघर्षाची नांदी असल्याचे मानले जात आहे.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि शेलार यांना समान न्याय लावावा, पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मरीन लाइन्स पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात आशिष शेलार यांचा गुरुवारी पोलिस मरीन लाइन्स ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला. त्या वेळी मरीन लाइन्स पोलिस ठाण्याबाहेर भाजपचे बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कागदी वाघांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हणत राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सकाळपासून आशिष शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपतील नेते अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदी शेलार यांच्यासह उपस्थित होते. या वेळी शेलार यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली.
महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही : शेलार
शेलार यांचा जबाब नोंदवून झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या वेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. “आज मी राजकीय भाष्य करणार नाही. खोटे गुन्हे दाखल करण्यास पळापळ सुरू आहे. याचा बोलविता धनी कोण आहे, हे बाहेर काढणार आहे,’ असे शेलार म्हणाले. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, महापौर पेडणेकर यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला; पण कटुता, अपमान असे कधी घडले नाही. त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही. यामागचा बोलविता धनी कोण, याची कल्पना मला आहे,’ असे शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल केल्याची शंका : फडणवीस
नागपूर - आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्याकरता गुन्हा दाखल करण्यात आला की काय अशी शंका आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महापौरच नव्हे, तर कुठल्याही महिलेबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजपचा कोणताही नेता त्यांच्याबद्दल वाईट वा चुकीचे शब्द वापरू शकत नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. त्यांची पत्रपरिषद वा प्रेसनोटचा अतिशय चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.