आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मुंबईतील रुग्णालयांतून सहा कोरोनाग्रस्तांचे मृतदेह गायब, पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरीट सोमय्या यांनी लिहिले गृहमंत्र्यांना पत्र

गेल्या काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांतून सहा कोरोनाग्रस्तांचे मृतदेह गायब झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी त्यासंदर्भात पत्र लिहून आरोप केला. त्यानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमल्याचे जाहीर केले.

सोमय्या यांनी मंगळवारी ट्विट करून गायब झालेल्या मृतदेहांची नावासह माहिती दिली. हे मृतदेह कोणत्या रुग्णालयांतून गायब झाले हेसुद्धा सांगितले. पालिकेच्या या भोंगळ कारभारासंदर्भात सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. तसेच मृतदेह गायब असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या मन:स्थितीची कल्पना करावी, असे सोमय्या यांनी बजावले आहे. केईएम रुग्णालयातून सुधाकर खाडे, घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातून मेहराज शेख, कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून विठ्ठल मोरे यांचा मृतदेह गायब झाला होता. नायर रुग्णालयातून मधुकर पवार आणि जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटलमधून राकेश शर्मा यांचा मृतदेह गायब झाला होता. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाने ग्यांतीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यापूर्वी अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे लाॅकडाऊन काळात सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमवारी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय कोरोना रुग्ण गायब झाला होता. या रुग्णाचा मृतदेह आज बोरिवली स्थानकात आढळून आला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आपल्या आजोबांचा जीव गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, यावरून देखील भाजप पुन्हा सत्ताधारी पक्षाला घेरण्याची शक्यता आहे.

महापालिकेचा दावा; पाच मृतदेह सापडले

एकूण सहा मृतदेह गायब होते. पैकी ५ मृतदेहांचा शोध लागला आहे. आता एका मृतदेहाचा शोध सुरू आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मृतदेह गायब होण्याच्या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. पुढील ५ दिवसांत त्यांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी या घटनेबाबत दोषी आढळून येतील त्यांच्यावर महापालिका सेवानियमावलीनुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

कोरोना रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकात

मृतदेह गायब झालेली रुग्णालये मुंबई पालिकेची आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर भाजपने भोंगळ कारभारासंदर्भात हल्ला चढवला आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून सोमवारी पळालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह मंगळवारी बोरिवली स्थानकात आढळून आला. या रुग्णाचा मृत्यू अपघाताने झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...