आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड:​​​​​​​उत्सवाच्या आशेने 1700 कोटी पणाला.. हेच तीन महिने कमाईचे! पुढील तीन महिने चित्रपटगृहे असतील फुललेली

मुंबई (विनोद यादव)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक मोठे स्टार आणि बिग बजेट चित्रपटांना प्रदर्शनाची प्रतीक्षा

काेरोनापासून दिलासा आणि सणवार सुरू होताच पुढील तीन महिने मोठ्या पडद्यावर मनोरंजन.. मनोरंजन.. आणि केवळ मनोरंजनाचीच धूम राहणार आहे. महाराष्ट्रात २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याच्या घोषणेसह त्याची तयारीही सुरू झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान सूर्यवंशी, बंटी और बबली-२, सत्यमेव जयते-२, तडप, चंडीगढ करे आशिकी, ८३ आणि जर्सीसारखे मोठे स्टार आणि बिग बजेटचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पुढील काही महिन्यांत येत असलेल्या बॉलीवूड चित्रपटांवर सुमारे १५०० ते १७०० कोटी रुपये पणाला लागले आहेत. या वर्षाचे शेवटचे तीन महिने इंडस्ट्रीसाठी सर्वाधिक कमाईचे मानले जात आहेत. कोरोनापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान बॉक्स ऑफिसचे संकलन १,००० कोटी रुपये महिना होते. यात २० टक्के दिवाळीत होत होते. २०१७ मध्ये या तीन महिन्यांतील अंदाजे संकलन ३,०००, २०१८ मध्ये ३,३०० कोटी होते.

हाताळणी खर्च वाढला, पण डिस्काउंट-आॅफर मिळेल
आयनॉक्स लीजरचे सीईओ आलोक टंडन म्हणाले, कोरोना नियमांमुळे चित्रपटगृहांचा हाताळणी खर्च वाढला आहे. अतिरिक्त मनुष्यबळ ठेवावे लागत आहे. प्रत्येक शोनंतर सॅनिटायझेशन केले जाते. त्यानंतरही तिकिटांचे दर वाढणार नाहीत. उलट डिस्काउंट आणि ऑफर देण्याची तयारी आहे. प्रेक्षक पूर्ण विश्वासासह पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळावेत हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

१७५ कोटींचा सूर्यवंशी, १०० कोटींचा बंटी और बबली-२
ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन म्हणाले, कोरोनामुळे रखडलेले अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. यात रोहित शेट्टींचा ‘सूर्यवंशी’ आहे. त्याचा खर्च १७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘बंटी और बबली-२’ चा खर्च १०० कोटी सांगितला जात आहे. तो १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते-२’ २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. त्याचा खर्च १०० कोटी रुपये आहे. आयुष्मान खुराणाचा ‘चंडीगढ करे आशिकी’ २५-३० कोटींचा आहे. शाहिदचा चित्रपट ‘जर्सी’ ५०-५५ कोटीत बनला असून ते डिसेंबरमध्ये प्रदर्शित होतील.

सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा डेब्यू चित्रपट ‘तड़प’चा खर्च ३० -३५ कोटी रुपये आणि रणवीर सिंहचा ‘८३’ चा निर्मिती खर्च १०० कोटीवर आहे. हे दोन्ही चित्रपट डिसेंबरमध्ये येणार आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचेे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांच्या मते , दीड वर्ष अत्यंत वाईट गेले. आता पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकांकडे पैसे आहेत, चांगले चित्रपट आल्यावर ते चित्रपटगृहांपर्यंत नक्कीच जातील. दरम्यान, केरळ सरकारनेही २५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

दिवाळीत अक्षय-रजनीकांत आमने-सामने: या दिवाळीला अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचे चित्रपटत आमने-सामने असतील. अक्षयचा सूर्यवंशी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली. तर सन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित रजनीकांतचा तामीळ चित्रपट अन्नात्थेही याच दिवशी प्रदर्शित होत आहे. याच दरम्यान मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा चित्रपट ‘द इटर्नल्स’ही भारतात प्रदर्शित करण्याची तयारी आहे. तत्पूर्वी ऑक्टोबरमध्येच वेमन-२ आणि द लास्ट ड्युअल रिलीज होईल.

पुढील वर्षही पूर्णपणे मनोरंजनाचे : फिल्म क्रिटिकचे योगेश मिश्रा यांच्या मते पुढील वर्षही पूर्णपणे मनोरंजनाचेच असेल. यशराज फिल्म्सने आपला चित्रपट पृथ्वीराज, जयेशभाई जोरदार आणि शमशेरा पुढील वर्षी प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हीरोपंती-२, भूलभुलैय्या-२, बच्चन पांडे, मेडे और ब्रह्मास्त्रसारखे बिग बजेट आणि मल्टी स्टारर चित्रपट आता २०२२ मध्ये प्रदर्शित होतील. विशेषत: बहुतांश राज्यांत १०० टक्के आसनक्षमतेनुसार चित्रपटगृहे उघडली जात नसल्याने सध्या ‘ वेट अँड वाॅच’ची स्थिती आहे. कोरोना असाच नियंत्रणात राहिला तर काही महिन्यांतच या चित्रपटांच्या खर्चासह चांगला नफाही निर्मात्यांच्या पदरी पडेल.

बातम्या आणखी आहेत...