आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावादात ठिणगी:महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही- बसवराज बोम्मई, कर्नाटक विधिमंडळात ठराव मांडणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समज दिल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा एकदा बरळले आहेत. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असे वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधिंडळात केले आहे. तसेच, याबाबतचा ठरावही विधिमंडळात मांडण्यात येईल, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.

सीमा, पाणी आणि भाषेचा वाद

मंगळवारी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा झाली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादावर भाष्य केले. बसवराज बोम्मई म्हणाले, मागील सरकारने घेतलेली भूमिका आणि राज्याच्या सीमा, पाणी आणि भाषा याबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. तसेच, या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर कर्नाटक सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली.

सीमावादावर ठराव

बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक विधानसभेची दोन्ही सभागृह महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर ठराव संमत करणार आहेत. काल कर्नाटक विधानसभेत बसवराज बोम्मई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर विधिमंडळाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आहे. महाराष्ट्राला कर्नाटक राज्याची एक इंचही जमीन देणार नाही. सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करू.

विरोधकांचा पाठिंबा

विरोधकांनीही बसवराज बोम्मईंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी बोम्मई यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. सिद्धरामय्या म्हणाले की, या प्रकरणात कोणत्याही वादाचा प्रश्नच उद्भवत नाही.

महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबत समज दिली होती. तरीही बोम्मईंचा आडमुठेपणा कायम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरुन कालच अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अजित पवार यांनी अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमके झाले काय?, यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दांत ठणकावून सांगितले. जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार अलमपट्टी धरणाची उंची वाढवत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारला मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका, असेही जयंत पाटलांनी राज्य सरकारला सुनावले.​​​​​​​

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, असे म्हणत पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...