आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ युतीचे दुसरे पर्व सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात सोमवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन वळवण्यात ठाकरेंना यश आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रस्ताव दिला होता, पण दोन्ही पक्षांनी तो नाकारला. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मतविभाजनामुळे काही मतदारसंघांत काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते. मात्र आता केवळ उद्धव ठाकरेंच्या आग्रहास्तव वंचितला आघाडीत घेण्यास दोन्ही पक्ष तयार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘वंचितची युती फक्त शिवसेनेशी असेल की आघाडीशी’ हा प्रकाश आंबेडकरांचा मूळ प्रश्न होता. याबाबत १० दिवसांत निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी ठाकरेंकडे व्यक्त केली. तर वंचितशी युती केवळ महापालिकांपुरती मर्यादित नसून आम्हाला ती दीर्घकाळ हवी आहे,’ असे ठाकरेंनी नमूद केले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनीही वंचितबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे सांगितले. तर माजी आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी अमरावतीत सांगितले की, महाविकास आघाडी सशक्त हाेण्यासाठी शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र येणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासाेबत येत असतील तर आनंदच आहे.
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांची पहिली बैठक, १० दिवसांनी दुसरी फेरी मतटक्का कमी, उपद्रवमूल्य जास्त 1 महाराष्ट्रात ‘बसप’ला २०१४ पर्यंत चांगली (७.९० %) मते मिळत होती. मात्र नंतर त्यांचा करिश्मा कमी झाल्यामुळे २०१९ पासून पूर्वाश्रमीचा भारिप बहुजन महासंघ म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला महत्त्व आले. 2 २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने ७.६० टक्के मते घेत काँग्रेस- राष्ट्रवादीचे १२ उमेदवार पाडले, तर विधानसभा निवडणुकीत ४.६० टक्के मते घेत काँग्रेस -राष्ट्रवादीच्या ३२ जागांचे नुकसान केले होते. 3 मुंबई महापलिका (२०१७) निवडणुकीत २२७ नगरसेवकांमध्ये आंबेडकर यांच्या भारिपला अवघी एकच जागा होती. 4 ‘वंचित’ला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार यांची संमती अद्याप मिळालेली नाही. ती न मिळाल्यास शिवसेनेला आपल्या कोट्यातील जागा द्याव्या लागतील.
‘भीमशक्ती’ची गरज सर्वांनाच बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले आता भाजपबरोबर आहेत. पीआरपी अध्यक्ष जाेगेंद्र कवाडे यांची शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर बोलणी चालू आहे, तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाण्यास अनुकूल आहेत.
पहिली गरज मुंबईतच { मुंबई मनपात शिवसेनेला ११४ बहुमताचा आकडा गाठायचा आहे. { २०१७ मध्ये शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. { अनेक नगरसेवक केवळ ५०० ते ७०० मतांच्या फरकाने जिंकले होते. पण आता शिवसेनेत मोठी फूट पडलीय, भाजपही सोबत नाही. त्यामुळे कमी मताधिक्याच्या वॉर्डात मोठा फटका बसू शकतो. { हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेला हक्काची ‘व्होट बँक’ असलेल्या पक्षांची गरज आहे.
आठवले गेल्यामुळे आंबेडकर आठवले : यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास आठवलेंच्या रिपाइंसोबत युती केली होती. त्याचा मुंबई मनपात दोन्ही पक्षांना फायदा झाला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांकडे हात पुढे केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आठ ते दहा दिवसांत चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.