आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी प्रयोग:व्हर्टिकल गार्डन पद्धतीने फुलवली बुश पेपर मिरी, एका गुंठ्यात १ लाख उत्पन्न

रायगड (विवेक ताम्हणकर )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बुश पेपर वनस्पतीची लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. काळी मिरी जवळपास ५ ते ६ मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळे काळ्या मिरीची उंची नियंत्रित होऊन तिचे मुबलक उत्पादन घेणे सोपे जाणार आहे. प्रामुख्याने अन्य झाडाच्या आधाराने वाढणारी वेलवर्गीय मिरी काढताना अनेकवेळा शेतकऱ्यांना अपघात झाले आहेत. मात्र, बुश पेपर मिरीमुळे मिरीची काढणी सोपी जाते, शिवाय एकावर एक कुंड्या रचून लागवड केली असल्यामुळे जास्त रोप लावता येतात व उत्पादनही अधिक मिळते.

राजन राणे यांनी एकावर एक अशा पाच कुंड्या रचून त्याचा व्हर्टिकल पिलर तयार केला आहे. पंधरा बाय पंधरा फुटाच्या जागेत असे त्यांनी चार पिलर उभे केलेत. एका कुंडीत ४ रोपे असे प्रत्येक पिलरवर बुश पेपर मिरीची २० रोप लावली आहेत. या चार पिलरवर लावलेल्या रोपांच्या माध्यमातून पाचव्या वर्षी कमीतकमी १०० किलो मिरी मिळते असे राजन राणे सांगतात. एका गुंठ्याला एक लाखाच्या उत्पन्नाची खात्री राणे देतात.

मातीचा पोत चांगला राहावा यासाठी अशी घेतात मेहनत
विशेष म्हणजे देवगडच्या कातळावर राणे यांनी आपली मिरी बाग फुलवली आहे. मातीचा पोत चांगला राहावा, त्यातला भुसभुशीतपणा टिकावा यासाठी कोकणात मुबलक मिळणाऱ्या नारळाच्या सोडणांचे (सालाचे) तुकडे त्यांनी मातीत मिक्स केले आहेत. पावसाळ्यात मिळणारे गांडूळही ते या झाडांच्या मुळात सोडतात. शिवाय सेंद्रिय खतांचा डोस ते या रोपांना देतात त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही. रोपे तजेलदार राहतात, असे राणे यांनी सांगितले.

कोकणात मसाला पिकांची शेती सुरू केली तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. देवगड तालुक्यातील पोयरे गावातील शेतकरी राजन राणे सध्या मेहनत घेत आहेत. गेली ५ वर्षे ते सतत प्रयोग करत असून त्यांना अपेक्षित यशही आले आहे. काळ्या मिरीच्या मसाला पिकाची शेती बरीच चर्चेत आहे. त्यांनी कोकणात प्रथमच बुश पेपर मिरीची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड केलीे. आपल्या घराच्या अंगणातही या पद्धतीने मिरीचे उत्पन्न घेऊ शकतो, असे राणे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.

रोजगाराची संधी

काळ्या मिरीची शेती कोकणात वाढली तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेले कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखले जावे यासाठी बुश पेपरचा सपोर्ट नक्कीच कामी येणार आहे. कोरोनामुळे कोकणातील अनेक मुंबईकर आपल्या गावात परत आले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत, अशा चाकरमान्यांनी आता शेतीच्या शास्त्रीय लागवडीकडे वळावे आणि स्वत: ला समृद्ध करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे. कोकणात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा प्रयोगांनी शेती फायदेशीर ठरणार आहे.

यशस्वी प्रयोग

  • घराच्या अंगणातही घेऊ शकतो मिरीचे उत्पन्न
  • कोकणात प्रथमच ‘व्हर्टिकल’चा प्रयोग
  • देवगडच्या कातळावर फुलवली शेती
बातम्या आणखी आहेत...