आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीला चक्क पुण्यातून कसाई कामगारांचा पुरवठा होणार आहे. त्यासाठी काही तरुणांना प्रशिक्षण देणे सुरू आहे, अशी माहिती जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी दिली.
फॅबिग यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. फॅबिग पूर्वी चेन्नई येथे जर्मनीचे वाणिज्यदूत म्हणून काम करत होते.
जर्मनीत सध्या मोठ्या प्रमाणात वृद्धांची लोकसंख्या वाढली आहे. नागरिकांचे सरासरी वयोमान 48 झाले आहे. त्यामुळे तिथे प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोठा तुटवडा आहे. किमान चार लाख कामगारांची आवश्यकता आहे. त्यामुळे जर्मनीने मनुष्यबळासाठी महाराष्ट्राला साद घातली आहे. फॅबिग म्हणाले की, जर्मनीला सध्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. नर्स, इलेक्ट्रिशिअन, सोलर युटिलिटी तंत्रज्ञांची तातडीने गरज आहे.
फॅबिग पुढे म्हणाले की, जर्मनीत कसायांचीही कमतरता आहे. त्यामुळे हे काम करण्यासाठी पुणे येथून सात जणांना जर्मनीत प्रशिक्षणासाठी पाठवले आहे. नंतर आणखी 60 कसाई कामगारांची गरज आहे. जवळपास 200 नर्सची आवश्यता आहे. त्यासाठी केरळच्या नर्सिंग कॉलेजशी करार केला आहे. सध्या जर्मनीच्या 800 कंपन्या भारतात काम करत आहेत. त्यापैकी किमान 300 कंपन्या पुणे शहर आणि परिसरात आहेत.
फॅबिग म्हणाले की, जर्मनीतून येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. मुंबई, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी 500 दशलक्ष युरो गुंतवले आहेत. 35 हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत. जर्मनीत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यात एकट्या बर्लिनमध्ये 17 हजार भारतीय आयटी तंत्रज्ञ राहत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.