आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात प्राथमिक शिक्षकांवरील प्रशासकीय बदल्यांची टांगती तलवार दूर झाली आहे. यंदा फक्त विनंती बदल्याच करण्यात याव्यात, असे ग्रामविकास विभागाने बुधवारी सर्व जिल्हा परिषदांना कळवले आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू असताना ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याची तयारी केली होती. बदलीपात्र अशा १५ टक्के शिक्षकांची माहिती जमा करून १० ऑगस्टला ऑफलाइन बदल्यांची प्रक्रिया पार पडणार होती. यादरम्यान ऑफलाइन पद्धतीवर प्रचंड टीका झाली होती. दुसरीकडे कोरोनाच्या या काळात बदल्यांची प्रक्रिया कशी पूर्ण करायची, असा प्रश्न जि. प. प्रशासनाला पडला होता. बदलीनंतर लाॅकडाऊनच्या काळात स्थलांतर करणे कठीण असल्याने बदलीपात्र शिक्षकही प्रचंड धास्तावलेले होते.
संघटनांनी शरद पवारांकडे मांडले होते गाऱ्हाणे
> ऐन कोरोना काळात शिक्षकांनी बदल्यांना विरोध केला होता. फडणवीस सरकारच्या काळात या शिक्षकांच्या बदल्यांसाठी लागू करण्यात आलेली आॅनलाइन पद्धती कायम ठेवावी, अशी मागणी शिक्षकांनी केली होती. त्यासाठी शिक्षक संघटनांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले हाेते.
> त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत कोल्हापूर येथे बैठक घेतली. यंदाच्या प्रशासकीय बदल्या रद्द करून विनंती बदल्या करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले हाेते. त्यासंदर्भातला शासन निर्णय बुधवारी जारी झाला.
अखेर शिक्षक बदलीचा वाद तात्पुरता थांबला
प्रशासकीय बदल्या रद्द केल्यामुळे यंदाचा शिक्षक बदलीचा वाद तात्पुरता थांबला आहे. प्रशासकीय बदल्या करताना समुपदेशन करताना मोठी गर्दी होते. त्यामुळे अंतर राखणे कठीण झाले असते. त्यामुळे यंदापुरत्या प्रशासकीय बदल्या रद्द केल्याचे कारण ग्रामविकास विभागाने दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.