आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅश व्हॅनसह ड्रायव्हर बेपत्ता:एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेली कॅश व्हॅन घेऊन अज्ञात चोरटे फरार, 4.25 कोटींसह ड्रायव्हर सुद्धा बेपत्ता; विरार येथील घटना

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅश टाकताना ड्रायव्हर व्हॅनमध्ये आणि मागचे दार सील होते, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग

दिवाळीच्या पूर्वसंध्येला एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी आलेली व्हॅन लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये 4 कोटी 25 लाख रुपयांच्या जवळपास रक्कम होती. या व्हॅनसह ड्रायव्हर सुद्धा बेपत्ता आहे. त्यामुळे, अज्ञात चोरट्यांसह त्याचा सुद्धा यात हात असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

चालकाचा कसून शोध

पोलिस उपायुक्त संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमध्ये गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास कोट महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्यासाठी एक व्हॅन आली. कॅश टाकण्यासाठी कर्मचारी आत गेले असता अचानक अज्ञातांनी व्हॅन पळवली. या व्हॅनमध्ये नेमकी किती रक्कम होती याची तंतोतंत माहिती नाही. तरीही सव्वा चार कोटी रुपयांच्या घरात कॅश असेल असा अंदाज आहे. या व्हॅनसह ड्रायव्हर सुद्धा बेपत्ता आहे. त्यामुळे, त्यानेच ही गाडी पळवली का किंवा त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याची सुद्धा चौकशी केली जात आहे. पोलिस सध्या त्या चालकाचा कसून शोध घेत आहेत.

कर्मचारी म्हणतात, चालकावर संशय येईल असे काहीच नव्हते

पोलिसांनी कॅश व्हॅनमध्ये आलेल्या इतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्याच दिवशी त्यांनी यापूर्वी काही एटीएममध्ये कॅश डिपॉझिट केले होते. त्या दरम्यान ड्रायव्हर कारमध्ये बसला होता. वाहनाच्या मागच्या बाजूला कॅशच्या पेट्या होत्या. चालकावर संशय येईल असे काहीच नव्हते. मागच्या बाजूने वाहन सील केले जायचे. विरारच्या एटीएममध्ये कॅश टाकल्यानंतर सुद्धा असेच झाले. वाहनात चालक बसला होता आणि मागचे दार सील होते. तसेच काही कर्मचारी एटीएममध्ये जाऊन डिपॉझिट करत होते. याचवेळी व्हॅन पळवण्यात आली.

वाहनात जीपीएस ट्रॅकिंग

ड्रायव्हरची ओळख अद्याप समोर आलेली नाही. सोबतच, जी कॅश व्हॅन पळवण्यात आली त्यामध्ये जीपीएस सिस्टिम सुद्धा आहे. ड्रायव्हर आणि इतर अज्ञातांना व्हॅनमध्ये जीपीएस आणि कॅश असल्याची माहिती आहे. त्यामुळे, त्यांनी त्या वाहनातील कॅशच्या पेट्या काढून दुसऱ्या वाहनात टाकल्या असाव्यात अशी शक्यता आहे. जीपीएस ट्रॅकिंगसह आसपासच्या सीसीटीव्ही सुद्धा तपासून पाहिल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...