आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी महाराष्ट्राच्या कायदे मंडळात जाती-धर्माची लढाई:खत हवंय तर जात सांगा! जातीच्या सक्तीवरून विरोधक आक्रमक

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लव्ह जिहादविरुद्ध सत्ताधाऱ्यांचा संताप

पुरोगामी महाराष्ट्राच्या कायदेमंडळात (विधानसभेत) शुक्रवारी जात व धर्माच्या सक्तीविरोधात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. रासायनिक खत खरेदीची ‘पॉस’ मशीनमध्ये नोंद करताना शेतकऱ्यांना विक्रेत्यांकडून सक्तीने जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार विरोधकांनी लक्षात आणून देत सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले आदींनी सरकार जातीयवादी असल्याचा आरोप केला. अखेर आक्रमक विरोधकांपुढे झुकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ई- पॉस’ मशीनमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यासंदर्भात केंद्र सरकारला कळवले जाईल, अशी ग्वाही दिली. दुसरीकडे, लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनी गदारोळ करत विरोधकांच्या मुद्द्याची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.

विक्रेत्यांकडून ई-पॉसमध्ये नोंदीसाठी सक्तीचा विरोधकांनी विचारला जाब
मुख्यमंत्री नरमले... सॉफ्टवेअरमधून जात वगळण्यासाठी केंद्राला सांगू

शेतकरी हीच आमची जात
खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारता? खतांच्या दुकानातील ई- पॉस मशीनमध्ये जातीच्या नोंदीचा रकाना कशासाठी टाकण्यात आला? हे सरकार जातीयवादी आहे. जात विचारून शेतकऱ्यांना वस्तू देणार का? शेतकरी हीच आमची जात आहे.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

हा बदल केंद्राकडून
प्रत्येक खत दुकानातील खत विक्रीची ई-पॉस मशीनमध्ये नोंद केली जाते. या ई-पॉस मशीनमध्ये केंद्राच्या कृषी खात्याने दिलेले सॉफ्टवेअर आहे. जातीच्या नोंदीचा प्रकार सदस्यांनी लक्षात आणून दिल्यामुळे लवकरच केंद्र सरकारकडे पत्र पाठवून जातीचा रकाना काढण्याबाबत सूचना करू.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सहा मार्चपासून सॉफ्टवेअरमध्ये आला जातीचा रकाना
सांगली जिल्ह्यातील दुकानांतून खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचे आमदार जयंत पाटलांनी समोर आणले. सहा मार्च रोजी केंद्रीय कृषी खात्याने या मशीनमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्यानंतर जातीचा रकाना वाढवण्यात आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

राज्यात लव्ह जिहादची एक लाख प्रकरणे; भाजपच्या मंत्र्याचा दावा
मुंबई । शेतकरी, महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक असताना सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात एक लाखाहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे असल्याची माहिती दिली. त्याला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तर आव्हाड कुणाची वकिली करत आहेत, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी गदारोळ केला. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी राज्यात लव्ह जिहादच अस्तित्वात नसल्याचा दावा केला. खोटी आकडेवारी देणारे मंत्री लोढा यांनी सभागृहात माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. आव्हाड यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे सत्ताधारी आमदारही आक्रमक झाले. भाजपचे आमदार योगेश सागर, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आव्हाडांना खडे बोल सुनावले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हस्तक्षेप करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस आहे. विनाकारण वादविवाद नको. सभागृहात ज्या कुणी वक्तव्य केले असेल ते तपासा आणि जे अयोग्य असेल ते कामकाजातून काढून टाका, अशी सूचना पवार यांनी केली. त्यानंतर पुढील कामकाज सुरु झाली.

ज्याची मुलगी जाते त्या बापाला दु:ख विचारा : गुलाबराव पाटील
{ आमच्या एकाही हिंदू भगिनीवर अत्याचार झाला तरी आम्ही बोलणार. लव्ह जिहादमध्ये मंत्र्यांनी कोणत्या धर्माचे-पंथाचे नाव घेतले का? कुणाबद्दल वाईट बोलले का, असा सवाल भाजपचे आशिष शेलार यांनी केला.

{ लव्ह जिहाद पाहायचे असेल तर तुम्ही चला माझ्या गावाला. माझ्या गावातही अशी दोन प्रकरणे झाली आहेत, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. लव्ह जिहादमध्ये ज्याची मुलगी जाते, त्या बापाला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो, अशी भावना पाटलांनी व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड तुम्ही मुंब्रात राहता म्हणून असे बोलू नका, असा टोलाही लगावला.

बातम्या आणखी आहेत...