आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजनांवर CBI कडून गुन्हा दाखल?:स्वत:च दिले स्पष्टीकरण, म्हणाले- याबाबत मला कोणतीही माहिती नाही!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यावर स्वत: गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय का? याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, मला आधी हे स्पष्ट करायचे आहे की, माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय? याबाबत मला कोणतीही माहिती नाहीये. पण पेनड्राइव्ह प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बिहार किंवा उत्तर प्रदेश पोलिसांनाही लाजवेल, अशाप्रकारे षडयंत्र करून माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मी मोबाइलवरून कुणाला तरी तीन वर्षे 12 दिवसांपूर्वी धमकी दिली होती, त्यानंतर तीन वर्षे 12 दिवसांनी माझ्याविरोधात एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सगळे षडयंत्र

पुढे वकिलावर आरोप करताना महाजन म्हणाले की, तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितले की, हा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर किती दबाव आहे. हा गुन्हा दाखल करावा, म्हणून खडसे किती वेळा फोन करतात? हेही त्यांनी मला सांगितले होते. पोलिस अधिकाऱ्यांवरही दबाव होता, हेही त्यांनी मला सांगितले. अशा प्रकारे त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. या खोट्या गुन्ह्यानंतर माझ्यावर मोकाअंतर्गत कारवाईचा आदेशही देण्यात आला होता. पण मी उच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो. जिथे मला दिलासा मिळाला. पण हे सर्व षडयंत्र सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचले होते.

चौकशीची भाजपची मागणी

पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांनी संबंधित पेनड्राइव्ह विधान सभेत ठेवला आहे. ज्यामध्ये माझ्यावर केसेस कशा दाखल केल्या? गिरीश महाजनांना कसे फसवले? गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांना कसे फसवायचे आहे? ह्या सर्व षडयंत्राचे चित्रीकरण त्यामध्ये झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवासांनी विधानसभेत केली होती. सीबीआय चौकशी करावी, ही आमची मागणी होती. पण तत्कालीन सरकारने संबंधित प्रकरणावरून सरकारी वकील रवींद्र चव्हाण यांना हटवले आणि सीआयडी चौकशी सुरू केली.”

प्रकरण सीबीआयकडे

दरम्यान मंगळवारी या प्रकरणी फडणवीस म्हणाले की, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राइव्ह दिला होता. त्या पेन ड्राइव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आले होते. हे सगळे प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र असेल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राइव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता.

बातम्या आणखी आहेत...