आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरावे:परमबीर उलटले तरीही सीबीआय; ईडीकडे अनिल देशमुखांविरुद्ध पुरावे, याचिकाकर्त्या ॲड. जयश्री पाटील यांचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आपल्याकडे पुरावे नाहीत, असे जाहीर करून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी काेलांटउडी मारली आहे. तरीही देशमुख यांची सहजासहजी सुटका होणार नाही. या प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या सीबीआय, ईडी या संस्थांकडे विविध भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळणार नाही, असा दावा याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांनी केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी खंडणी वसुलीप्रकरणी पुरावे नसल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी राज्याच्या चांदीवाल आयोगाकडे सादर केले आहेत. या प्रकरणाला हे नाट्यमय वळण मिळाल्यानंतर पुढे काय होऊ शकेल, याबाबत ‘दिव्य मराठी’ने चाचपणी केली. अॅड.पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरच मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यासंदर्भात अॅड. पाटील म्हणाल्या की, केंद्राच्या दोन संस्था अनिल देशमुख प्रकरणाचा तपास करीत आहेत. सीबीआय, ईडी आणि तिसरा राज्याचा न्या.चांदीवाल आयोग. पैकी चांदीवाल आयोगाकडे पुरावे सादर करण्यास परमबीर यांनी नकार दिला. पण, काही हरकत नाही. सीबीआयच्या हाती देशमुखांच्या १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी भक्कम पुरावे लागलेले आहेत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री अन् राज्यपाल यांना देशमुखांच्या कथित १०० कोटी वसुलीसंदर्भात पत्र (२० मार्च) लिहिले. तेव्हा मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली, त्यान्वये न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयचा याप्रकरणी तपास सुरू आहे. मुंबईतले बार, हाॅटेल व हुक्का पार्लर व्यावसायिक यांनी वसुली संदर्भातले पुरावे दिले आहेत. ते देशमुख यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. तसेच ईडीच्या हाती देशमुख यांची बेहिशेबी मालमत्ता लागली आहे. त्यामुळे देशमुख १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी नक्कीच दोषी ठरतील, असा दावा अॅड. पाटील यांनी केला.

दिवाळीच्या दिवशीही चौकशी
अनिल देशमुख यांची दिवाळीच्या दिवशीही सुमारे ४ तास चौकशी करण्यात आली. तत्पूर्वी १२.३० वाजेपासून सुमारे तासभर त्यांची जे.जे.रुग्णालयात रूटीन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर १.३० वाजता त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात नेण्यात आले.

देशमुखांची सहजासहजी सुटका नाही : अॅड. सतीश तळेकर
ईडीने अनिल देशमुख यांच्या काही शेल कंपन्या शोधल्या आहेत. देशमुख यांच्या शिक्षण संस्थांमध्ये पैशाची बेकायदा वळवावळवी उघड केली आहे. सीबीआय व ईडी या दोन्ही संस्था केंद्राच्या आहेत. त्यामुळे कथित १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी देशमुख सहजासहजी सुटणे अवघड आहे, असे अॅड. सतीश तळेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...