आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरेनंतर आता फिरले कांजूरमार्ग जागेचे वारे:कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला केंद्राचा ‘रेड सिग्नल’; ही जागा तर मिठागराची, उद्योग संवर्धन मंत्रालयाचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाकरे-फडणवीसांतील वैराचा मेट्रो प्रकल्पाला बसणार फटका

मेट्रो कारशेड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याची घोषणा केली असताना त्या जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा, असे पत्र केंद्राने राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या पवित्र्यामुळे मोदी सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यात संघर्ष पेटला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याला पत्र पाठवून कारशेडच्या जागेवर हक्क सांगितला आहे. कांजूरमार्गची जागा मिठागराची असून त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. या जागी एमएमआरडीने सुरू केलेले कारशेडचे काम थांबवण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे..दरम्यान, या प्रकरणाची सर्व कागदपत्रे पडताळलेली आहेत. तसेच महाधिवक्ता यांचे याप्रकरणी मत विचारात घेऊन कांजूरमार्गची जागा निश्चित केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

> आरे कारशेडमधून प्रकल्प हलवण्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लाभ होणार आहे. तर काही करून महापालिका जिंकायची असा भाजपचा पण आहे. त्याचा फटका मेट्रो प्रकल्पाला बसणार आहे.

> मेट्रो प्रकल्पातील कुरघोडीचे राजकारण माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील वैयक्तिक मानले जात आहे. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी यामध्ये संयत भूमिकेत आहेत.

‘आरे’च्या जागेवरून प्रतिष्ठेचा प्रश्न

मेट्रोच्या डब्यासाठी आरे काॅलनीतील जंगलात डेपो करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यासाठी गतवर्षी विधानसभा निवडण्ुकीच्या ऐन धामधुमीत अारेतील २७०० वृक्ष रात्रीतून कापण्यात आले होते. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी स्वत: लक्ष घातल्याने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला होता. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला. तसेच ‘अारे’चा ८०० एकर परिसर राज्य सरकारने जंगल म्हणून घोषित केला आहे. ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीही हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.

जमीन राज्याचीच, कारशेडचे काम थांबवण्याचा प्रश्नच नाही

कांजूरमार्गच्या जागेसंदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी जमिनीची कागदपत्रे तपासली आहेत. या जागेप्रकरणी न्यायालयात वाद नाही ना, याची खातरजमा महसूल विभागाने केलेली आहे. जमीन राज्याचीच आहे, कारशेडचे काम थांबवण्याचा प्रश्नच नाही, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

देशात आणीबाणी आणली जात आहे : सुप्रिया सुळे

केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून घेण्याचे काम करत आहे. या देशात हळूहळू आणीबाणी आणली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पर्यावरणाची काळजी असणाऱ्यांनी इमारती बांधणे योग्य नाही :

नागपूर | ‘आरे’ वाचवून पर्यावरणाची काळजी करणाऱ्यांनी मिठागराच्या जागेवर इमारती बांधणे योग्य नाही. मी महसूलमंत्री होतो त्यामुळे मिठागराची जागा केंद्र सरकारची असते हे मला पक्के माहीत आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

कांजूरमार्गविषयी फडणवीस यांचेच प्रतिज्ञापत्र : महापौर पेडणेकर

फडणवीस मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गची जागा राज्याच्या मालकीची असल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले होते, मग आता जमीन केंद्राची कशी झाली, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तर अहंकारातून मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्गचा निर्णय घेतला असून त्याचा त्रास मुंबईकरांना हाेणार आहे, असा आरोप भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.